मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील उपशिक्षकांची नुकतीच आंतर जिल्हा बदली झाली. यातील बरेच शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात, स्वतःच्या घरी आनंदाने हजर झाले. तरीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दहा ते पंधरा वर्षे नोकरी केल्यामुळे या जिल्ह्यातील संस्कृतीशी, या जिल्ह्यातील लोकांशी ते एक रूप झाले. येथील पाहुणचाराने त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याशी एक आपुलकीचे भावनिक नाते निर्माण झाले. यातील अनेक शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हा विषयी भरभरून लिहिले.मालवण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेले श्री. कृष्णा ज्ञानदेव कोकाटे हे मूळ बीड जिल्ह्यातील. त्याने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल खालील प्रमाणे भावना व्यक्त केली.
स्वर्गाहून सुंदर -कोकण
हिरवीगार घनदाट झाडी, जंगल,डोंगर, दऱ्या,वळणावळणाचे लाल मातीतील पक्के रस्ते, पावसाळ्यात पांढरेशुभ्र पाण्याचे झरे अंगाखांद्यावर खेळवणारे मनोहर घाट, प्रेक्षणीय धबधबे, स्वच्छ मऊ- मऊ रेती असणारे स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, दोन्ही बाजूला नारळाची गर्द झाडी असणाऱ्या खाडया, नारळ-पोफळीच्या, काजू, हापूस आंब्याच्या बागा, उत्कृष्ट रचना असणारी गावोगावची सुंदर मंदिरे असा एकंदरीत सुंदर, स्वच्छ, रमणीय, स्वर्गीय निसर्ग. कोकणात सगळ्या चालीरीती आहेत. त्या सगळ्या मानवाला आनंदी ठेवणाऱ्या आहेत. उत्साहाने जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत. इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही. त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो. इथं मुलींना सासुरवास नसतो, हुंडाबळी प्रकार इकडे घडत नाहीत. इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीची २० भर आंबोळ्या टाकून घर जेवू घालते इथली बाई..,फणसाच्या अठळीला शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला. घावणे, वडे, चटणी, सोलकढी, वेगवेगळया प्रकारचे शेकडो मासे, कुर्ले, चिकन, नैसर्गिक रानभाज्या, नाचणीची भाकरी इ.खूप समृद्ध आणि चविष्ट खाद्यसंस्कृती आहे इथली. इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल! आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे! इथं मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे. मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही…आपलीच पोरं म्हणून आईवडील पोसतात…मुली पुढाकार घेऊन वेगवेगळया नोकऱ्या करतात. इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो. स्त्रियांचा जन्मदर जास्त आहे. कोकणी माणूस स्वभावाने शांत आहे, समंजस आहे. बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण खून पडणार नाहीत. कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा. नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील. लोकांना खूप चांगली शिस्त आहे.भ्रष्टाचार खूप कमी किंवा नाही म्हटले तरी चालेल. स्वच्छता, सुंदरता इथल्या माणसांच्या नसानसात भिनलेली आहे. कितीही गरिबी असू द्या ,घरोघरी स्वच्छतागृह आहेत. गावाबाहेरील रस्ते स्वच्छ असतात. शिक्षणाच्या बाबतीत लोक जागरूक आहेत. शाळेत लोकांचा सक्रीय सहभाग असतो. मालवणी ही गोड भाषा आम्ही सिंधुदुर्गात शिकलो. जीव लावणे, घासातला घास देणे हे कोकणात शिकावे.. प्रत्येकाच्या घरी कधीही जा उत्कृष्ट पाहुणचार मिळेल. इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे..धो धो पावसासारखे बरसणारं, खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार…अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं…फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..करवंद, जांभळे, तुरट गोड. त्याच्या काळजात भरली शहाळी ही ओळ अगदी सार्थ लागू पडते. गणेशोत्सव, शिमग्याची गोष्टच न्यारी. माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं,भक्ती हवी त्यासाठी हे उत्सव..एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं… माणसांबरोबर, प्राण्यांवर, निसर्गावर भरभरून प्रेम करणारी ही माणसं. प्राण्यांशीही अगदी प्रेमाने बोलतात. गावातील लोक पैशाने श्रीमंत नसतीलही, पण मनाची श्रीमंती त्यांच्याकडे खूप आहे. शिक्षक म्हणून गावात राहताना घरच्यांसारखी काळजी ही माणसं घेतात. अंघोळीला जाण्यापूर्वी बाथरूममध्ये गरम पाणी, टॉवेल वगैरे आधीच ठेवलेला असतो. रात्री झोपायला जाण्यापूर्वी अंथरून त्यांनी घालून ठेवलेले असते.अगदी न चुकता दररोज! विशेष चांगली वागणूक तुम्हाला मिळते. निस्वार्थी सेवा यांच्याकडून शिकावी.वस्तू घेताना आपण पैसे देऊ केले तर एवढेच द्या असे कधीच म्हणणार नाहीत. काय ता देवा-म्हणजेच ही माणसे पैशांसाठी सेवा करत नाहीत. पैशांसाठी हपापलेलीही नाहीत. दशावतार, डबलबारी भजने, सण-उत्सव, विविध धार्मिक कार्यक्रम, नृत्ये, गावोगावच्या, जत्रा, क्रिकेट स्पर्धा इथे मनोरंजनाची कमतरता नाही. याठिकाणच्या भजनांचा कोणीच नाद करू नये. भजनातील गाण्यांना श्रवणीय चाली लावल्या जातात. ही कलाकारांची भूमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणी माणूस समाधानी आहे. आपल्या प्रयत्नांनी आपण मिळवूच.पण सध्या आहे त्यात समाधानाने राहणारा आहे. गावापासून दूर असल्याने, कौटुंबिक अडचणींमुळे कोकणातून बदली करावी लागली. पण कोकण आणि कोकणी माणसांच्या गोड आठवणी कायम हृदयात राहतील आणि मी कोकणात पुन्हा-पुन्हा येईन..
श्री.कृष्णा ज्ञानदेव कोकाटे,उपशिक्षक. मालवण आंतरजिल्हा बदलीधारक Mob. 9420704604