सावंतवाडी: कवीवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने या वर्षीचे विविध साहित्य प्रकारातील अव्वल पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव गावच्या स्नेहा विठ्ठल कदम हिच्या हेतकर्स प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘शिल्लक भितीच्या गर्भकोशातून’ या काव्यसंग्रहाची कवी भीमराव कोने विशेष काव्य पुरस्कारासाठी निवड झाली असून, पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम दहा हजार रुपये, स्मृती चिन्ह, व सन्मान पत्र असे आहे.
सदर पुरस्काराचो वितरण मान्यवर साहित्यिकांच्या हरस्ते २१ जानेवारी २०२४ रोजी, मायको हॉल, राजे संभाजी स्टेडियम शेजारी, सिंहस्थनगर सिडको, नाशिक येथे सायंकाळी, ६ वाजता संपन्न होणार आहे. सदर काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका तथा मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते झाले होते. दलित पँथरचे जे. बी. पवार, ज्येष्ठ लेखिका ‘आयदानकार’ उर्मिला पवार, डॉ. प्रकाश मोगरे, आशालता कांबळे, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. प्रतिभा आहिरे, प्रतिमा जोशी या मान्यवर साहित्यिकांनी या काव्यासंग्रहास गौरविले आहे.
सम्यक साहित्य परिषद व अपरांत साहित्य कला प्रबोधिनी, प्रसंवाद परिवारातर्फे स्नेहाचे विशेष कौतुक केले गेले आहे. बालपणापासूनच साहित्य वाचन, लेखनाची आवड जोपासणाऱ्या व व्यवसायाने इंजिनियर असणाऱ्या स्नेहा कदम हिला ज्येष्ठ साहित्यिक तथा कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सुनील हेतकर यांची सातत्याने प्रेरणा मिळाली. तसेच आरती मासिक, कोमसाप, सिंधुदुर्ग साहित्य संघ, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंच, महाराष्ट्र यांनी प्रेरणा दिली आहे. स्नेहा हिच्या या स्तुत्य यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे