सावंतवाडी प्रतिनिधी: सोनुर्ली तिठा ते आरोस बाजार रस्ता हा मागील वर्षभरापासून खड्डेमय झाला होता. त्याचप्रमाणे या रस्त्याने प्रवास करताना प्रवासी तसेच दुचाकी स्वारांना त्रास होत होता व या खड्डेमय रस्त्यावर बरेच अपघात झाले अशाही तक्रारी होत्या, सदरबाब लक्षात येताच सिंधुदुर्ग स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी उप अभियंता श्री वैभव सगरे यांचे सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग संघटनेचे पदाधिकारी मंदार नाईक, संदेश सावंत, निलेश देसाई, गिरगोल दिया, सुनील नाईक व आरोस ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते व प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात आली होती. त्यानंतर श्री सगरे यांनी लवकरच त्या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी उपअभियंता श्री वैभव सगरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी सिंधुदुर्ग स्वाभिमानी संघटनेचे सावंतवाडी तालुका समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते मंदार नाईक, नंदू परब, ज्ञानेश्वर नाईक, प्रवीण आरोसकर इतर पदाधिकाऱ्यांनी सदर काम दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी पाहणी केली. त्याचप्रमाणे निवेदनाची दखल घेत काम सुरू केल्याने उपकार्यकारी अभियंता श्री. वैभव सगरे यांचे आभार मानले.