दुचाकी-चारचाकींची रॅली; ठिकठिकाणी औक्षण व सत्कार.
सावंतवाडी (न्हावेली) : न्हावेलीचे सुपूत्र पॅराकमांडो कृष्णा सखाराम नाईक हे सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. याप्रीत्यर्थ न्हावेलीतील श्री इसवटी कला क्रीडा मंडळ, ग्रामसचिवालय, न्हावेलीतील शाळा, ग्रामस्थ व नाईक परिवाराने गावात येताच कृष्णा नाईक यांचे जल्लोषात स्वागत करुन भव्य मिरवणूक काढली. गावात सन्मान सोहळ्याचे आयोजन करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
न्हावेली येथे सकाळी ९ वा. श्री देव टेमकरी, भोमवाडी येथे कृष्णा नाईक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची सपत्नीक गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील दुचाकी व चारचाकी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मिरवणुकीदरम्यान जि. प. शाळा नं. २ येथे कृष्णा नाईक यांचे औक्षण करुन शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक संतोष रावण यांनी श्री. नाईक यांचे स्वागत करुन मुलांना सैनिकांच्या कार्याची महती सांगितली. स्वत:च्या शाळेत झालेल्या स्वागतामुळे आपण भारावून गेल्याचे व हा सत्कार अविस्मरणीय असल्याचे निवृत्त सैनिक कृष्णा नाईक यांनी सांगितले. मुलांच्या वाद्यांनी व भारतमातेच्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
जि.प. शाळा नं. १ मध्येही श्री. नाईक यांचे मुख्याध्यापिका स्मिता नाईक, शिक्षक वर्ग , पालक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले. स्मिता नाईक यांनी विद्यार्थ्याना सैनिक व शेतकरी यांची महती सांगितली. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी देशभक्तीपर गीत सादर करुन त्यांना सलामी दिली. पालकांनी नारळाचे रोप भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कार केला.
गावातील परबवाडी व भवानी मंदिर येथेही महिलांनी औक्षण केले. न्हावेली ग्रामपंचायतीत सरपंच अष्टविनायक धाऊस्कर, उपसरपंच संतोष नाईक व सदस्यांनी स्वागत केले. आपल्या गावातील या सैनिकाच्या कार्याबाबत सरपंचांनी अभिमान व्यक्त केला. यावेळी आरोग्यसेवक सुशांत कामत यांनीही श्री. नाईक यांचा सन्मान केला. आशा स्वयंसेविका सुमन नाईक, सविता मेस्त्री, श्रद्धा कालवणकर, विनायक आरोंदेकर,ग्रा.पं. सदस्य नेहा पार्सेकर, आरती माळकर, राजश्री कालवणकर, हेमचंद्र सावंत, आदी उपस्थित होते.
कृष्णा नाईक यांनी देवी माऊली रवळनाथ मंदिरात देवतांचे दर्शन घेऊन मिरवणुकीचे विसर्जन झाले. त्यानंतर पुष्पवर्षाव व देशभक्तीपर घोषणा देऊन श्री. नाईक यांना वाजतगाजत घरी नेण्यात आले. याठिकाणी श्री देव इसवटी कला क्रीडा मंडळ व इतर माजी सैनिकांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. सुरुवातीस कु. सान्वी मोरजकर-आरोस व नेहा शिरसाट- मळेवाड या मुलींनी नृत्यातून गणेशवंदना सादर करुन रसिकांची मने जिंकली. तसेच त्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करुन कार्यक्रमास रंगत आणली. यावेळी मंडळातर्फे, माजी सैनिकांतर्फे पॅरा कमांडो कृष्णा नाईक यांच्यासह त्याच्या वीरमाता सुवर्णा नाईक, पिता सखाराम नाईक व पत्नी साधना नाईक यांचाही सत्कार करण्यात आला. व्यक्तिगत स्तरावरही अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास श्री देव इसवटी कला क्रीडा मंडळाचे सदस्य, महिला बचत गट सदस्य, सर्व नाईक कुटुंबीय, आप्तेष्ट परिवार व देशप्रेमी उपस्थित होते.
कृष्णा नाईक यांचे काका अनंत नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. काकी अनिता नाईक, भाऊ समीर नाईक यांसह सर्वच कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान दिसत होते. प्रीतीभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. एकूणच, गावातील माजी सैनिकाविषयीचा अभिमान या कार्यक्रमातून ओसंडून वाहताना दिसून आला. यावेळी ग्रामस्थ व हिंतचिंतकांची लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली.