Home स्टोरी सुवासिनींचे स्वामींच्या वटवृक्षाभोवती सप्तजन्म सौभाग्याचे साकडे!

सुवासिनींचे स्वामींच्या वटवृक्षाभोवती सप्तजन्म सौभाग्याचे साकडे!

106

हजारो सुवासिनींच्या वडपुजेने वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा उत्साहात साजरा….

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज वटपौर्णिमा सण मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला. सती सावित्रीच्या श्रध्देय सौभाग्याच्या पुजेपासून भारतीय संस्कृतीत सौभाग्याचा वारसा वटपौर्णिमेस व वडपुजेस लाभलेला आहे. त्यामुळे या वटपौर्णिमेस अनन्यसाधारण महत्व आहे. आज सकाळपासूनच असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा करत हजारो सुवासिनींनी स्वामींच्या वटवृक्षाभोवती सप्तजन्म सौभाग्याचे साकडे घातले.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील साक्षात श्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व असल्याने येथे दरवर्षी वटपौर्णिमेस वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली हि वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी स्वामींच्या दरबारी साजरी करतात. आज वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही वडपूजेकरिता येणाऱ्या महिलांची संख्या वाढतच असल्याचे निदर्शनास आले. वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षास वडपूजा करून आपले जीवन सार्थक झाले असून या वटवृक्षाच्या रुपातून साक्षात श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद आपणास लाभले असल्याचे मत काही सुवासिनी महिला भगिनींनी व्यक्त केले. वटपौर्णिमा असल्याने श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. भाविकांच्या दर्शनाकरिता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. पौर्णिमेनिमित्त झालेल्या भाविकांच्या गर्दीत वयोवृध्द तसेच विकलांग भाविकांच्या दर्शन सोईकरीता विशेष प्राधान्याने व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांच्या दर्शनाच्या व इतर सोयीकरिता व त्यांच्या सुरक्षिततेकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी देवस्थानचे मंदार पुजारी व कुटूंबीय, महेश इंगळे कुटूंबीय, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, संतोष पराणे, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, विश्वास शिंदे, संजय पवार, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, विपूल जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सचिन हन्नूरे, सुवर्णा जाधव, कृष्णाबाई घाटगे, लखन गवळी, ऋषिकेश लोणारी, श्रीकांत मलवे आदींससह असंख्य सुवासिनी माताभगिनी उपस्थित होत्या.