सावंतवाडी प्रतिनिधी: अखंड अशा तपसाधनेने पवित्र पावन झालेल्या ‘श्री सिद्धेश्वरांच्या डोंगरावर’ अर्थात श्री सिद्ध महापुरुष समाधी मठ कारिवडे गोसावी वाडी येथे वार्षिक भंडारा उत्सव मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होत आहे.
ही केवळ जत्रा नसून अखंड तपसाधनेने संजीवन समाधीस्थ झालेल्या श्री वैराग्यनाथ यांची व रक्षणकर्ती श्री भैरी देवी यांची माघ पौर्णिमेनिमित्त साज-साजशृंगार, पुष्पहारांसह होणारी पूजाअर्चा , ढोल चौघड्यांसह होणारी धुपारती, नाथ नाथ परंपरेप्रमाणे होणारी घटस्थापना, नवस बोलणे व फेडणे, भावाच्या ओढीने माहेराला भेटायला येणारी बहीण ग्रामदेवता श्री कालिका माता व श्री सिद्ध महापुरुष यांची अलौकिक अशी ‘भेट ‘ भक्ती शक्तीचा संगम… हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी भाविकांना मिळते, त्यासोबतच ओटवणेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, अन्य मनोरंजन, कोकणातील प्रसिद्ध खाद्य संस्कृतीतील खाद्यपदार्थ हे सर्व आपणास येथे अनुभवता येईल.
नाथ संप्रदायातील रिती परंपरेत भंडाऱ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या देवाला ‘पतीर भरेन’ म्हणजेच अन्नदान करेन असा नवस बोलला जातो या ‘पतीर भरेन’ या नवसाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी पंचक्रोशीत ख्याती या देवस्थानची आहे.
भंडारा निमित्त आलेल्या भाविकांना ‘सांदणी’ (तांदळापासून बनविलेला पदार्थ ) प्रसाद म्हणून दिला जातो. भंडाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ज्याला ‘शेळाभंडारा’ अथवा द्विज भंडारा म्हटले जाते त्या दिवशी ग्रामदेवता कालिकामातेचा भक्ततरंगासह गृहस्थानी जाण्याचा अलौकिक असा सोहळा पार पडतो.
अशा या अलौकिक आनंद देणाऱ्या उत्सवात आपण परिवारासह उपस्थित राहून दर्शनाचा या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी विनंती श्री सिद्ध महापुरुष सेवा मंडळा कडून करण्यात येत आहे.