चिपळूण: भारत-सीमेवर झालेल्या भूस्खलनात मोरवणे, चिपळूण येथील सुभेदार अजय शांताराम ढगळे हुतात्मा झाले आहेत. भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्यासाठी जागेची ‘रेकी’ करण्यासाठी सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याच वेळी सततचा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे २४ मार्च या दिवशी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांचे समवेत असलेले ५ सैनिक दरडीखाली गाडले गेले होते.या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय सेना दलाच्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.अजय ढगळे यांचे पार्थिव १ एप्रिल या दिवशी संध्याकाळी ‘तवंग’ येथे आणण्यात आले असून २ एप्रिलच्या संध्याकाळी त्यांचे पार्थिव गुवाहाटीला आणले जाईल. त्यानंतर गुवाहाटीवरून ३ एप्रिलला विमानाने पुणे येथे पार्थिव आणण्यात येईल. त्यानंतर पुणे येथून रस्तेमार्गे मोरवणे येथे आणले जाईल.मोरवणे येथे अजय यांचे आई-वडील असतात. त्यांची पत्नी आणि मुले मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्यास आहेत.