सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५ वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून याच उपक्रमांतर्गत या छत्र्यांचे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालय, उर्दू हायस्कुल, सावंतवाडी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ आणि शाळा क्रमांक ५, माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कुल, ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यालय, कोलगाव येथील कोलगाव माध्यमिक विद्यालय, दाणोली येथील बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालय अशा शहरासह ग्रामीण भागातील एकूण ९ माध्यमिक व प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. प्रत्येक गरीब व गरजू विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्याहस्ते छत्र्यांचे वितरण करण्यात आले. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतुक करीत प्रतिष्ठानचे आभार मानले.