Home स्टोरी सिंधुदुर्ग पोलीस विभागातर्फे दि.१९ ते २६ जून २०२३ या कालावधीत अंमली पदार्थ...

सिंधुदुर्ग पोलीस विभागातर्फे दि.१९ ते २६ जून २०२३ या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन!

146

सिंधुदुर्ग: अंमली पदार्थाचे सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे. अंमली पदार्थामध्ये कोकेन, ब्राऊन शुगर, हेरोईन चरस, एलएसडी, एमडीएमए, एमडीए, एसटीपी, मेफेड्रोन इत्यादी प्रमुख पदार्थाचा सामावेश होतो. अंमली पदार्थ्याच्या सेवनामुळे गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवतात. त्याचबरोबर ती पिढीही बरबाद होते. हे टाळण्यासाठी अंमली पदार्थ सेवन करु नये, यासाठी पोलीस विभागातर्फे दि.१९ ते २६ जून २०२३ या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.   

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (संग्रहित फोटो)

अंमली पदार्थाच्या उत्पादन, विक्री, वाहतुक सेवन यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने १९८५ साली गुंगीकारक पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला. अंमली पदार्थाचे सेवनामुळे मृत्यु, आरोग्य ढासळणे, हृदयाची स्‍पंदने याढणे, झोप न येणे, बेशुध्द होणे, नाकातून रक्त येणे, श्वसनाचा त्रास होणे, दात शिवशिवणे, शरीर थरथर कापणे इत्यादी गंभीर परिणाम माणसाचे शरीरावर होतात. काही अंमली पदार्थाचे रुग्ण आत्महत्येलाही प्रवृत्त होतात. तरुणांनी कॉलेज जिवनाचा आनंद घेणे, थ्रील अनुभवणे यासाठी अंमली पदार्थाच्या मार्गाचा अवलंब करू नये.   

संग्रहित फोटो

अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे परिणाम हे सेवन करणाऱ्या व्यक्तीबरोबर त्यांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतात, आणि पर्यायाने त्‍या पिढीवर कायमस्वरुपी गंभीर परिणाम होऊन ती पिढी बरबाद होते. तरी तरुणांनी व नागरीकांनी अंमली पदार्थाच्या आहारी न जाता प्रत्येकाने चांगल्या सवयी अंगी काराव्यात, काही वेळा प्रलोभनामुळे तरुण पिढी अंमली पदार्थ घेण्याकडेही वळते, मात्र त्यामुळे त्या तरुणांचे नागरीकांचे आयुष्य बरबाद होते.   

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय (संग्रहित फोटो)

 

जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. वेंगुर्ला, निवती पोलीस ठाणे- दि. १९ जून सिंधुदुर्गनगरी, कुडाळ पोलीस ठाणे- दि. २० जून, मालवण, आचरा पोलीस ठाणे- दि. २१ जून सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग पोलीस ठाणे- दि. २२ जून कणकवली, वैभववाडी पोलीस ठाणे दि. २३ जून आणि देवगड, विजयदुर्ग पोलीस ठाणे दि. २३जून आयोजित करण्यात येणार आहे.     

१९ ते २६ जून या कालावधीत शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा आयोजन सदर दिनाचे औचित्य साधुन ज्‍युनिअर कॉलेज, सिनियर कॉलेज, मेडीकल कॉलेज, लॉ कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज येथील प्राध्यापक, मुले, पत्रकार सामाजिक स्वंयसेवी संस्था, वकील, वैद्यकीय अधिकारी,  तालुका आरोग्य अधिकारी, गट  विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या सहभागातून (DRUG FREE INDIA) अभियान यशस्वी होण्यासाठी जनजागृती करीता पथनाट्य, ढोल पथक, अंमली पदार्थाचे सेवनाने होणान्या दुष्परीणामाच्या बॅनरसह रॅली, शाळा व सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी स्वतंत्र कार्यशाळा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   

दिनांक २६ जून रोजी डीपीडीसी हॉल येथे NDPS, कायदा, व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ या विषयावर १० ते १ वाजेपर्यतच्या दरम्यान मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस स्टाफ, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद स्टाफ उपस्थित राहणार आहे. 

वरील कालावधीत अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यासाठी सर्व पोलीस ठाणे अधिनस्थ स्वतंत्र पथक निर्माण करुन अंमली पदार्थ विक्रेते, वाहतुक करणारे, अंमली पदार्थ सेवन करणारे, व्यक्तीची माहिती मिळवून प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीचे ताब्यात मिळालेला अंमली पदार्थ कोठून, कोणत्या मार्गाने, कोणत्या प्रकारे, कोणाकडून घेण्यात आला व तो पुढे कोणाला देणार होता याबाबतची साखळी शोधुन त्याचे मुख्य स्त्रोत ठिकाण शोधुन अंमली पदार्थाचे साठ्यांचा समूळ नायनाट करण्यात येणार आहे. तसेच नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थ तसेच विक्री करणारे सेवन करणारे, किंवा त्यांचेशी संबंधीत उपयुक्त माहिती असेल तर तात्काळ नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग किंवा संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना कळवावी, जेणेकरुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.