Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० पासून पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० पासून पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळा

137

१६ जुलै, सिंधुदुर्ग वार्ता : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सागरी पर्यटनासोबत जिल्ह्यातील कृषी ,इतिहास ,संस्कृती,वैद्यकीय पर्यटन ,कातळशिल्प पर्यटन,साहसी पर्यटन, खाद्यपदार्थ पर्यटन अशा क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कार्यरत आहे. जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यतेखाली 431 पर्यटन ग्राम समिती गठीत होत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपर्यटन समिती गठीत झालेला कोकण विभागातील सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांचे योगदान महत्वाचे आहे. ग्रामविकासअधिकारी ,सरपंच,ग्रामसेवक यांचेही सहकार्य लाभले आहे .

ग्रामस्तरावर गठीत झालेल्या पर्यटन समितीची पुढील कार्यपद्धती काय असावी,कशा प्रकारे पर्यटन क्षेत्रात कार्य व्हावे यासाठी जिल्हा परिषद-सिंधुदुर्ग व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुका स्तरावर दिनांक २० जुलै ते २४ जुलै या काळात प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती सभागृहात पर्यटन कार्यशाळा आयोजित होणार आहेत. तसे आदेश प्रजीत नायर यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
गुरुवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10.30 वा. कणकवली, दुपारी 2 वाजता वैभववाडी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी, दुपारी 2 वाजता दोडामार्ग, शनिवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10.30 वा.मालवण, दुपारी 2 वाजता देवगड, दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10.30 वा.वेंगुर्ला व दुपारी 2 वाजता कुडाळ तालुक्यात पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे हे
स्वतः उपस्थित राहून गठीत पर्यटन समितीस मार्गदर्शन करणार आहेत.