Home राजकारण सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय सावंतवाडीत स्थलांतरीत करण्याची आमदार राजन तेली यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय सावंतवाडीत स्थलांतरीत करण्याची आमदार राजन तेली यांची मागणी

204

कणकवली प्रतिनिधी: जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग हे सावंतवाडी येथे स्थलांतरित करण्याची मागणी माजी आमदार राजन तेली यांनी सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डिसेंबर 2020 मध्ये मंजूर केले. त्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचे जिल्हा सामान्य रूग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी स्थावर आणि जंगम मालमत्तेसह हस्तांतरित केले आहे. जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीत सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कार्यरत आहे. त्याकरिता शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालयाची व रूग्णालयाची स्वतंत्र पदे मंजूर केली आहेत.  प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रूग्णालय असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रूग्णालय जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सन 1998 पासून कार्यरत होते. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आणि एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे देखील पडवे, ता. कुडाळ याठिकाणी आहे. ही दोन्ही रूग्णालये कुडाळ तालुक्यात येत असून खऱ्या अर्थाने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी कोणतीही वैद्यकीय सोय नाही. त्यामुळे या तीनही तालुक्यातील रूग्णांना गोवा राज्यातील रूग्णालयांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे जिल्हा रूग्णालय हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह लवकरात लवकर स्थलांतरित करावे, अशी आम जनतेच्या वतीने मागणी करतो.

जिल्हा रूग्णालय व संदर्भ सेवा रूग्णालय हे एकाच ठिकाणी स्थापन झाल्यावर जनतेला एकाच छताखाली आरोग्य व वैद्यकीय सुविधा मिळतील. याबाबत सकारात्मक विचार होऊन समस्त सिंधुदुर्गच्या जनतेने केलेल्या मागणीप्रमाणे, जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह स्थलांतरित करणेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी विनंती या पत्रातून केली आहे.