Home क्राईम सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाकडुन गुन्हेगारी कृत्य करणा-याविरुध्द हद्दपार कारवाई.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाकडुन गुन्हेगारी कृत्य करणा-याविरुध्द हद्दपार कारवाई.

133

सावंतवाडी: येथील दोघांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले गणेश गजानन काळसेकर, (वय २५ वर्षे) रा. निरवडे, गौरेश दिलीप कामत, (वय ३१ वर्षे) रा. दुर्वांकुर बिल्डींग, उभाबाजार, विठ्ठल मंदीर नजिक, सावंतवाडी पांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

 

पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या दोघांना बेकायदेशिर कृत्ये करण्याची सवय जडलेली असल्याने व ते पुन्हा-पुन्हा गुन्हे करुन सर्वसामान्य लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण करुन सर्वसामान्य नागरीकांना जुलुम, जबरदस्ती, धाकदपटशा दाखवुन दहशत निर्माण करीत होते. त्यांच्यावर दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचेवर कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशिर कारवाई झालेली होती. तरी सुध्दा ते त्यांचे वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा करीत नव्हते. उलट पुन्हा-पुन्हा गुन्हे करीत असल्याने त्यांच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याची सावंतवाडी भागातील लोकांच्या मनात दहशत/भिती निर्माण झालेली असल्याने त्यांचे पा कृत्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) प्रमाणे काम चालवुन त्यांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापुर या तीन जिल्हयातून हद्दपार करण्याकरीता प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांना पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी सादर केलेला होता.

 

उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांचे न्यायालयात गणेश गजानन काळसेकर व गौरेश दिलीप कामत, सावंतवाडी यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम१९५१ च्या कलम ५६ (अ) (ब) अन्वये काम चालवुन त्यांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुर या जिल्ह्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार केलेबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी निर्गमित केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

सदरची नोटीस हद्दपार इसम गणेश गजानन काळसेकर यास बजावणी केलेली असुन त्यास गोवा येथे सोडण्यात आलेले आहे. तसेच गौरेश दिलीप कामत याचे कुटुंबियांना नोटीसची बजावणी केलेली आहे, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. कृषिकेश रावले व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण, पोलिस हवालदार मुकुंद सावंत, अनिल धुरी यांनी केलेली आहे. सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आडदांड स्वरुपाच्या, बेकायदा कृत्ये करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करणेत येईल असे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.