२३ जुलै वार्ता: गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बंद झाल्याने गगनबावडा व वैभववाडी तालुक्यात अवजड वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगाा लागल्या आहेत.गगनबावडा तालुक्याला गेले तीन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. कुंभी धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. महामार्गावर मांडूकली नजीक रस्त्यावर जवळपास अडीच फूट पाणी असल्याने मार्ग वाहतुकीला संबंधित प्रशासनाने बंद केला आहे. वैभववाडी, करूळ घाट मार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या आज फोंडा, राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. पावसाने जोर असाच कायम ठेवल्यास हा मार्ग बंदच राहणार आहे.