Home स्टोरी सिंधुदुर्ग कॉलेजच्या १९७९ च्या कॉमर्स बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे गेट टुगेदर.

सिंधुदुर्ग कॉलेजच्या १९७९ च्या कॉमर्स बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे गेट टुगेदर.

81

मालवण प्रतिनिधी: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण या कॉलेजच्या १९७५ ते १९७९, वाणिज्य शाखा या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथील सभागृहात संपन्न झाला. एस एस सी होऊन सोमवार दि. २१ जुलै १९७५ रोजी कॉलेज प्रवेश घेतल्याला सोमवार दि. २१ जुलै २०२५ रोजी बरोबर पन्नास वर्षे पूर्ण झाली: त्यानिमित्ताने हे आयोजन होते, तारीख, वार तेच होते हा योगायोग.

सेवांगण मध्ये सुमारे २३ जण मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, रत्नागिरी, गोवा येथून आलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते, ज्यामध्ये तीन महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. श्री सातेरी देवीचे, बिळवस यात्रेदिवशी दुपारी दर्शन घेऊन सायंकाळी ५ वाजता पहिल्या सत्राची सुरवात झाली. वाणिज्य शाखेच्या एकूण ४१ विद्यार्थी मधून काही जण कामाच्या व्यापामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, चर्चा, गप्पा आणि सुग्रास भोजन झाले; रविवारच्या सत्रात श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड किनारा, पवन चक्की, पोखरबाव गणेश दर्शन, असा धार्मिक पर्यटन कार्यक्रम केला. मालवण बाजारपेठ फेरफटका मारून सायंकाळच्या सत्रात प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले; प्रत्येकाला बोलायला लावलेच. यावेळी आमचे दिवंगत वर्गमित्र स्व अरुण परुळेकर, स्व. शशिकांत पराडकर, स्व अनिल शिरोडकर, स्व मंदा देसाई यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या उत्तराधिकारी याना सुवर्णमहोत्सवी स्मृतिचिन्ह देऊन स्मृती जागृत केल्या.

सुवर्ण महोत्सवीवर्ष निमित्त बनवलेल्या स्मृतिचिन्हांचे वितरण स्वीकारताना सर्वांचे डोळे आठवणींने पाणावले दिसत होते. एकमेकांच्या हस्ते ही आठवण दिली गेली; ही संकल्पना नवीन होती. मनोगतात आपापले तत्कालीन किस्से सांगून, हास्य, विनोद, चेष्टा, मस्करी, टवाळी करण्याचा युवा दशेतील मोह कुणाला आवरला नाही, त्यामुळे आनंदाला पारावर राहिला नाही.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सोमवारी सकाळी १० वाजता महाविद्यालयात पायी चालत पोचले. कॉलेजमध्ये प्रो. खोत सरानी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कॉलेज परिसरात काहींनी आठवणी जागवून सांगितले की सोमवार, २१ जुलै १९७५ रोजी ज्या वर्गात बसलो होतो, त्याच वर्गात सहज डोकावले तर सध्याच्या प्रो नाईक मॅडम शिकवत होत्या. त्यांची परवानगी घेऊन वर्गात सारे विद्यार्थी म्हणून आठवून त्याच बेंचवर बसले. उपस्थित युवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मोह आवरला नाही. तेव्हा झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. बॅचच्या वतीने दीपक सावंत, दीपक भोगटे, दीपक चव्हाण यांनी सर्वांच्या वतीने आठवणी, मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य श्री ठाकूर सर काही कामानिमित्त बाहेर असल्याने दूरध्वनीवरून संपर्क झाला, त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, परंतु उपस्थित शिक्षक यांनी आमचा छोटेखानी सत्कारही केला. आम्हीही आमचे विचार शब्दात लिहून मानपत्र देऊन महाविद्यालयातील आजी माजी अध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांचा सत्कार करून सर्वांना धन्यवाद दिले. कॉलेजमधील आताच्या तीन विद्यार्थिनीनी लेबर वेल्फेअर या विषयात उच्चपातळीवर बक्षिसे मिळवली त्यांचा हृद्य सत्कार आमच्या बॅचच्या वतीने करण्यात येऊन विजेला मुलींना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महाविद्यालयाच्या ऋणाची काही अंशी परतफेड म्हणून उपस्थित प्राध्यापकांनी निर्देश केल्याप्रमाणे विविध शैक्षणिक मार्गदर्शन उपक्रम मुलांसाठी आयोजित करण्याचे आमच्या बॅचने ठरविले असून कॉलेजसाठी मदतीचा हात देण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या परीने कॉलेजसाठी उत्स्फूर्त सहभाग द्यावा असे आवाहनही करण्यात आले.