Home स्टोरी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’साठीच्या वार्षिक भत्त्यात वाढ करण्याची मागणी

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’साठीच्या वार्षिक भत्त्यात वाढ करण्याची मागणी

237

हिंदु जनजागृती समितीचे भाजपचे आमदार नितेश राणे यांना निवेदन!

मालवण: मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशातील एकमेव ‘शिवराजेश्वर मंदिर’ आहे. या मंदिरासाठी सरकारकडून प्रतिमासाला केवळ २५० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता आवश्यक तो निधी सरकारकडून देण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार नितेश राणे यांना देण्यात आले. या वेळी आमदार राणे यांनी विषय समजून घेतल्यानंतर, ‘यामध्ये मी लक्ष घालतो, तसेच हे काम पूर्ण होण्याचे दायित्व माझे आहे’, असे आश्वासन दिले.

 

आमदार राणे यांच्या येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी २७ ऑक्टोबर या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील, डॉ. नितीन ढवण आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी आमदार राणे यांची सदिच्छा भेट घेतली.

 

आमदार राणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की…

१. या मंदिरासाठी दिला जाणारा वार्षिक भत्ता वर्ष १९७०-७१ पासून ३ सहस्र रुपये इतका करण्यात आला; मात्र त्यानंतर या भत्त्यामध्ये वाढ केल्याची नोंद सापडत नाही.

 

२. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या अल्प भत्त्यामध्ये मंदिरात दिवाबत्ती करणे, वीजदेयक भरणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी प्राथमिक आणि अत्यावश्यक गरजांचीही पूर्तता करणे शक्य नाही.

 

३. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाचे ठसे आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत. अशा या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवून हे ठिकाण पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करणे आवश्यक आहे.

 

४. मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी, अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी.

 

५. शिवरायांचे हे भारतातील एकमात्र मंदिर आहे. पर्यटन विभाग, शासनाचे प्रतिनिधी, तसेच इतिहासतज्ञ यांनी एकत्रितपणे मंदिराची पहाणी करून मंदिराचे जतन आणि शिवरायांच्या कार्याची माहिती देण्याच्या दृष्टीने आराखडा निश्चित करावा अन् कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यात यावे.