सावंतवाडी प्रतिनिधी: विशेष निधी अंतर्गत सह्याद्री पट्ट्यातील सावरवाड ते कलंबिस्त, शिरशिंगे, गोटेवाडी, असा जवळपास अडीच कोटी रुपये खर्चाचा रस्ता खडीकरण, डांबरीकरण व रुंदीकरण मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्याचे काम गेल्या मे महिन्याच्या अखेरीस पावसाळा प्रारंभ होताच जवळपास दोन ते अडीच किमी अंतराचा रस्ता फक्त खडीकरण करून करण्यात आला. मात्र त्यावर डांबरीकरण अथवा अन्य कुठलेही काम गेले सात-आठ महिने करण्यात आले नाही. येत्या १५ जानेवारीला या उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण व लेवल चे काम करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दिले होते. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अधिकारी व ठेकेदार यांची बैठक झाली. या बैठकीत असे ठरवण्यात आले होते. मात्र सदर ठेकेदाराने व अधिकाऱ्याने दिलेले आश्वासन त्यांचे हवेत विरले आहे. वारंवार गेले सात-आठ महिने संबंधित विभागाचे अधिकाऱ्याने ठेकेदार या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची फक्त दिशाभूल करत आहेत.
या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री असताना जे ठेकेदार व अधिकारी असे काम चुकारपणा करत असतील आणि काहीतरी कारणे पुढे करून कामे अर्धवट ठेवत असतील तर त्यांच्यावर आपण कारवाईचा बडगा दाखवू. असे सांगितले होते. पण केसरकर यांच्या मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे अशी अर्धवट स्थितीतच आहेत व निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे केसरकर यांनी या बाबीकडे आता गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मागील अडीच वर्ष आणि पाच वर्षाचा कालावधी फक्त टोलवाटोलवीत गेला असेल. पण आता जनता सुज्ञ झाली आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी अशा ठेकेदारांना वेळीच आवरणे गरजेचे आहे. नाहीतर केसरकर यांच्या कार्यपद्धतीवरच जनता बोट दाखवल्याशिवाय राहणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सध्या शासनाच्या एकंदरीत धोरणामुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी निधी अपुरा येत असल्यामुळे ठेकेदाराही हैराण आहेत. असे ठेकेदार सध्या या अधिकाऱ्यांना जुमतच नाहीत. फक्त आश्वासने द्यायची हे चाललं आहे. जर आता दिलेल्या १५ जानेवारी नंतर दोन दिवस उलटले तरी रस्त्याचे काम हाती न घेतल्यामुळे कलंबिस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, उद्या १७ जानेवारीला या संदर्भात आमदार दीपक केसरकर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. अन्यथा सदरचा रस्ता आंदोलन करण्यात येईल असेही ठरवण्यात आले आहे.
ठेकेदाराने आणि अधिकारी यांनी १५ जानेवारीला रस्ता सुरू करून तो १७ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. असे आश्वासन वारंवार दिले जात आहे. मात्र या रस्त्यामुळे या भागातील जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. खडबडीत रस्त्यामुळे वाहनधारकांची वाहने नादुस्त होत आहेत. याला जबाबदार कोण? येत्या दोन दिवसात सदरच्या रस्त्याचे काम हाती न घेतल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे व संजय पालकर यांनी स्पष्ट केले आहे.