सावंतवाडी: सावंतवाडी येथील बाजारपेठ भवानी चौक येथील श्री सद्गुरू साईबाबा मंदिरात १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे सुश्राव्य भजन व रात्री चेंदवणकर – गोरे दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘रक्तवर्ण जन्म’ हा दशावतार नाट्यप्रयोग पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शैलेश परब, रूपेश राऊळ, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष विजय देसाई, पत्रकार रूपेश हिराप, विनायक गांवस, प्रसन्ना गोंदावळे, नाना धोंड, भुवन नाईक, मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सचिव पै. ललित हरमलकर, पै. गौरव कुडाळकर, पै. दादू हरमलकर, कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संघटक निलेश पारकर यांसह विविध स्तरातील मान्यवरांनी साईंच दर्शन घेतले.
यावेळी चेंदवणकर – गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे संचालक सुधीर दळवी, राष्ट्रीय खेळाडू प्रसन्ना परब, शिवव्याख्याते प्रा. रूपेश पाटील, सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक म्हापसेकर यांच्या विधायक कार्याची दखल घेऊन साईभक्त मंडळ, भवानी चौकच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक व राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख, अध्यक्ष दानिश शेख, खजिनदार सुनील नेवगी, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, ज्ञानदीप मंडळाचे संस्थापक वाय. पी. नाईक, खजिनदार एस. आर. मांगले, सहसचिव विनायक गांवस, आदी उपस्थित होते.