Home क्राईम सावंतवाडी पोलिसांची गांजा प्रकरणी मोठी कारवाई….

सावंतवाडी पोलिसांची गांजा प्रकरणी मोठी कारवाई….

206

सावंतवाडी: सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री गांजा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवून गांजा पार्टी प्रकरणातील आणखी एका आरोपीला कुडाळ रेल्वे स्टेशन येथून १० ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले आहे. राहुल राठोड असे त्याचे नाव आहे. गांजा पार्टी या प्रकरणी चौकुळ, इन्सुली, सासोली, कोलगाव अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयताकडून दुचाकीसह तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलगाव येथे गांजा पार्टी करताना दोघा युवकांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कॅजिटन पिन्टो आणि सौरभ कदम या दोघांना ताब्यात घेतले होते. तर अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले होते. त्यानंतर रात्री केलेल्या तपासात सावंतवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता गांजा विकणाऱ्या कुडाळ येथील युवकाचे नाव उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक त्या ठिकाणी पाठवले. यावेळी १० ग्रॅम वजनाचा गांजा घेवून राठोड हा आला. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीसह जुनी तलवार जप्त करण्यात आली आहे. दरम्यान रात्री केलेल्या तपासात पोलिसांकडे अन्य चौघांची नावे उघड झाली आहे. यात १ कोलगावचा, दुसरा दोडामार्ग, सासोली-डोंगरपाल, तिसरा चौकुळ आणि चौथा इन्सुली-बांदा येथील असल्याचे उघड झाले आहे. तर या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता आहे. त्यानुसार आपण तपास करत आहोत, असे पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक अधिकारी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, सुरज पाटील, आनंद यशवंते यांच्या पथकाकडून करण्यात आली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राठोड याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलीस कोठडी देण्यात आली, तर पिंटो आणि कदम याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.