सावंतवाडी प्रतिनिधी: पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा. त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. ऐवळे म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायालय आणि मीडिया या दोघांकडून जनतेला न्याय मिळतो. त्यामुळे पत्रकारांचे महत्त्व अबाधित असून त्यांनी आपल्या बरोबर आपल्या कुटुंबीयांचीही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सकस आहार आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.