सावंतवाडी: जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मान्यतेने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर एम.डी. फिजियन डॉक्टर, प्रतिनियुक्तीवर रेडिओलाँजिसँट, भुलतज्ञ देण्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी मान्य केल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने २६ जानेवारीला पुकारलेले उपोषण तूर्त स्थगित केले.
सावंतवाडी उप जिल्हा रूग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे, प्रशासकीय पदे भरणे, ट्रामा केअर युनिट सक्षमतेने कार्यान्वित करणे, सकिँट बेंचच्या आदेशानुसार समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन सादर केलेल्या अहवालासंदर्भात कार्यवाही व्हावी, बाह्यस्थ कंत्राटी सेवा कर्मचा-यांना कराराप्रमाणे पूर्ण वेतन तसेच थकीत रक्कम मिळणे वगैरे विविध कारणांसाठी कृती समितीने दि.२६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीला रूग्णालय प्रशासनाने कृती समितीशी संपर्क करून उपोषण मागे घेण्याबाबत तसेच चर्चेसाठी विनंती केली. कृती समिती सदस्यांनी सावंतवाडी रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. ऐवळे, डा. गिरीषकुमार चौगुले यांच्यासह 22 जानेवारी आणि 24 जानेवारीला अशा दोन बैठका झाला. बैठकीस कृती समितीचे राजू केळुसकर, रविंद्र ओगले,अँड. नंदन वेंगुर्लेकर, एन.बी. रेडकर, माडखोल माजी सरपंच संजय लाड, अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, तुषार विचारे, किशोर चिटणीस, संतप दळवी, चद्रकांत घाटे,क्रुझ फर्नांडिस,रुग्ण कल्याण समितीचे रवी जाधव, सामाजिक बांधिलकेचे लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, संतोष तळवणेकर(सबनीसवाडा) आदी उपस्थित होते. बैठकीत रूग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांची कमतरता तसेच अन्य गैरसोयीबाबत चर्चा केली.त्यानंतर अधिक्षक डाॅक्टर ऐवळे यांनी रूग्णालयातील समस्या मान्य केल्या. यातील बहुतेक सर्व प्रशासकीय बाबी असून जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य संचालक आणि शासन स्तरावरून त्या कार्यवाहीच्या आहेत असे स्पष्ट केले. त्यास अनुसरून रुग्णालयाने त्या पूर्ततेच्या अनुषंगाने केलेल्या पाठपुराव्याची माहिती कृती समितीला दिली. एकूणच समस्या निराकरणासाठी कार्यालयाने अधूनमधून पाठपुरावा केला तरी तो पुरेसा नव्हता हे कृती समितीने त्यावेळी निदर्शनास आणून दिले.त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यांनी गैरसोयीच्या बाबींसंदर्भात ताबडतोबीने आपण जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठपुरावा करतो आणि लवकरात लवकर कळवतो असे कृती समितीच्या बैठकीत सांगितले.
दि.२४ जानेवारी रोजी वैद्यकीय अधीक्षक यानी कृती समिती सदस्यांना पुन्हा बैठकीसाठी निमंत्रित केले. त्यावेळी बैठकीचे इतिवृत्त घेऊन केलेल्या आणि करत असलेल्या कार्यवाहीच्या अनुशंगाने माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.तसेच रूग्णालयातील गैरसोयीबाबतच्या मुद्द्यांबाबत अधीक्षक यानी कार्यालयाने सुरू केलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत दिला. रूग्णालयातील लिफ्ट सुरू करण्यातील अडचणींबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती इंगवले देसाई यावेळी उपस्थित होत्या.त्याबाबत आवश्यक कार्यवाहीच्या सूचना कंत्राटदार व अन्य संबंधिताना देण्यात आल्या.
रूग्णालयात तूर्त एक फिजिशीयन डाॅक्टर प्रतिनियुक्तीवर, एका भुलतज्ञाची नियुक्ती,ट्रामा केअर युनिटसाठीच्या जागेसाठी रूग्णालयाच्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटसाठी व्यवस्था, प्रतिनियुक्तीवर रेडिओलाॅजिस्टची नेमणूक, रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी पुरवठादारांकडून थकीत वेतन आदा करण्याची हमी वगैरे समस्यांची उकल बैठकीत झाली. कृती समितीने नमूद केलेल्या समस्यांचे निराकरण तात्पुरते झाले.
दरम्यान कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक डाॅ.दिलीप माने यानी नजीकच्या कालावधीत सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पहाणी करून कृती समितीबरोबर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या सर्व बाबी विचारात घेऊन कृती समितीने दि.२६ जानेवारीचे उपोषण तात्पुरते स्थगित केले.
–———————— —-
चौकट
३२ लाखांची लिफ्ट पाण्यात
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात ३२ लाख रुपये खर्च करुन लिफ्ट बसविण्यात आली. मात्र ती बंद अवस्थेत आहे. लिफ्टच्या डक्ट मध्ये पूर्ण पाणी साचले आहे.ती धोकादायक झाली आहे. त्यामुळे लिफ्ट असूनही ती रुग्णांना वापरता येत नाही.३२ लाखांची लिफ्ट आजही पाण्यात असल्याचा आरोप कृती समितीने केला.
—————– – – ——
चौकट
डॉ. सुरेश सावंत सावंतवाडीत रुजू
दरम्यान उपसंचालक कार्याकडून डॉ. सुरेश सावंत येथील उप जिल्हा रुग्णालयात हजर झाले आहेत. त्यांची नियुक्ती अधिसंख्य पदावर करण्यात आली आहे. तसेच उपसंचालक डॉ. माने यांनी सावंतवाडी येथे नियमीत डॉक्टर देण्याचा शब्द कृती समितीला दिला आहे. तसेच डॉ. माने लवकरच सावंतवाडी रुग्णालयाची पाहणी करण्यास येणार आहेत.







