Home स्टोरी सावंतवाडी येथे आयोजित सतरावे निमंत्रित कवियत्री संमेलन संपन्न…!

सावंतवाडी येथे आयोजित सतरावे निमंत्रित कवियत्री संमेलन संपन्न…!

240

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्रातील कवयित्रींची काव्यलेखन परंपरा फार मोठी आहे. संत कवयित्रींनी ती समृद्ध केली आहे. तोच वारसा आजच्या कवयित्री समर्थपणे हाताळत आहेत. सन २००० नंतरच्या अलिकडच्या कवितेत बदल होताना दिसत आहे. केवळ स्त्रीविषय हाताळणारी कविता हा समज आजची कविता मोडताना दिसत आहे. आजच्या कवयित्री वेगळ्या धाटणीच्या सर्वस्पर्शी कविता विलक्षण ताकदीने लिहीत आहेत. त्यांनी आपल्या कवितांचा पैस वाढविला असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सतराव्या निमंत्रित कवियत्री संमेलनाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना पुणे ज्येष्ठ कवयित्री-समीक्षक अंजली कुलकर्णी यांनी केले.

सावंतवाडी येथील आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निमंत्रितांचे १७ वे विभागीय कवयित्री संमेलन श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात रविवारी संपन्न झाले. त्यावेळी पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री-समीक्षक अंजली कुलकर्णी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.

गोव्यातील आघाडीच्या कवयित्री प्रा. अनुजा जोशी या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून लाभल्या होत्या. यांसह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या यावेळी व्यासपीठावर पुणे येथील प्रा. मृणालिनी कानिटकर, मुंबईतील उज्ज्वला लुकतुके, रत्नागिरीतील प्रा. जयश्री बर्वे, गोव्यातील आसावरी कुलकर्णी व आयोजक प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक उषा परब उपस्थित होत्या.

प्रारंभी आयोजक प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक उषा परब, आरती मासिकाचे सहसंपादक भरत गावडे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कोमसापचे तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते सन्माननीय कवयित्रींचा गौरव करण्यात आला निमंत्रित कवयित्रींनी एकापेक्षा एक बहारदार काव्य सादर करून संमेलन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रज्ञा मातोंडकर यांनी या काव्यमैफलीचे सूत्रसंचालन केले. सुरुवातीला निमंत्रित कवयित्री नंदा चव्हाण यांनी स्त्रीजीवनावर भाष्य करणारी ‘तू चालत राहतेस..’ ही कविता सादर केली. या कवितेस टाळ्यांची दाद मिळाली. गोव्यातून आलेल्या आसावरी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘मला म्हणाला ऋतू एकदा ..’ या काव्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रीतम ओगले यांची ‘पाऊस अवकाळीचा’, शालिनी मोहोळ यांची ‘आनंदाचे झाड’ या कविता रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मुंबईतील उज्ज्वला लुकतुके यांनी सादर केलेल्या सुरेल लघुरामायणाने वातावरणास भक्तीमयतेचा साज चढविला. सुरेल रामायण ऐकताना रसिक मंत्रमुग्ध झाले होते. डॉ. दिपाली काजरेकर यांची ‘तुला पाहिले संसारात रमताना..’ ही कविता व प्रा. हर्षवर्धिनी सरदार यांची ‘पर्याय’ या कवितांनी उपस्थितांना विचारउद्युक्त केले. रसिकांच्या मनाला या कविता भावल्या. रत्नागिरीतील प्रा. जयश्री बर्वे यांनी तृतीयपंथीयांच्या वेदनेकडे संवेदनशीलतेने पाहणारी कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. त्यांची ‘आशीर्वचन’ ही कविताही उपस्थितांना भावली. अनुराधा आचरेकर यांच्या ‘तुम्ही येतलास म्हणान..’ या साधारण विडंबनात्मक कवितेने वातावरणात विनोदाचे रंग भरले. कल्पना बांदेकर यांनी ‘रसाळ फणस’ ही मालवणी वास्तववादी कविता सादर करून मने जिंकून घेतली. पुण्याच्या प्रा. मृणालिनी कानिटकर यांनी शहरी जीवनातील स्त्रीच्या भावना मांडणारी ‘त्याला आवडते म्हणून..’ ही कविता सादर केली. त्यांनी ‘सुंदर साजिरे आणिक गोजिरे’ ही लयबद्ध कविता गाऊन दाखविली. या कवितेचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. प्रा. श्वेतल परब यांच्या ‘हे पृथ्वीजा’ या कवितेने रसिकांच्या मनाचा वेध घेतला. या कवितेने रसिकांना विचारउद्युक्त करुन टाळ्यांची पसंती मिळविली. वर्षाराणी अभ्यंकर यांनी ‘सांग ना काय झाला गुन्हा ?’ ही कविता लयबद्ध ठेक्यात गाऊन सादर केली. प्रा. अनुजा जोशी यांची ‘साडी’ ही कविता विशेष भावली. सर्वांच्या आग्रहास्तव साहित्यिक उषा परब यांनी सादर केलेली ‘गुंता’ ही कविता काव्यप्रेमींना आवडली. त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘किल्ला’ व ‘कविता लिहीणं’ या कविता रसिकांची मने जिंकून गेल्या.

.

या काव्यसंमेलनासाठी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहातील लावलेली भित्तीपत्रे उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरली. या भित्तीपत्रांवर ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, नीरजा, शांता शेळके, इंदिरा संत, अनुराधा पाटील यांच्या कवितांच्या ओळी होत्या. सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी प्रशालेच्या विद्यार्थीनी आकांक्षा जाधव, सानिया घाडी व शिक्षक मिलिंद कासार, श्वेतल परब यांनी सुंदर सुवाच्च हस्ताक्षरात या कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या.

एकूणच, आयोजकांचे उत्तम नियोजन, मान्यवरांची उपस्थिती, रसिक-प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद व कवयित्रींच्या विविध रंगछटांनी भरलेल्या कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले. समारोपावेळी प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

फोटो:  सावंतवाडी आरती मासिक, कोमसाप सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सतरावे निमंत्रित कवियत्री संमेलनात अध्यक्ष अंजली कुलकर्णी बाजूला अनुजा जोशी, उषा परब.