सावंतवाडीत प्रतिनिधी: सध्याची राजकीय परिस्थिती ही शहरवासीयांसाठी केवळ मनोरंजनाचा विषय बनला आहे. मी मोठा की तू मोठा या राजकीय संघर्षामध्ये शहरवासीयांच्या गंभीर समस्यांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. दररोज होणारे राजकीय प्रवेश त्यामुळे होणाऱ्या भूकंपाने सावंतवाडी शहर हादरत आहे. खूप काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत असा भास निर्माण केला जात आहे. परंतु याचा सर्वसामान्य जनतेला फायदा काय या गोष्टीचा गांभीर्याने विचार करता शहरवासीयांच्या अनेक समस्यांचा भूकंप येणाऱ्या निवडणुकीमध्ये येथील नागरिक घडवून आणणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
सावंतवाडी शहरातील जनता सुज्ञ आणि सावध आहे असं म्हटलं जात परंतु त्याचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच दिसून येईल. गेली चार वर्षापासून सावंतवाडी शहरातील जनता रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, डास,सांडपाणी अशा अनेक आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त झालेली दिसून येते. या चार वर्षात या समस्यांवर ज्या लोक प्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिला आहे अशा उमेदवारांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये येथील जनता नक्कीच निवडून आणेल अशी अशा व्यक्त करतो.







