Home स्टोरी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

115

सावंतवाडी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने नववा आंतरराष्ट्रीय योगा दिन सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदिवानांसोबत साजरा केला. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने सर्व बंदिवानांना योगासनाच्या प्रत्येक प्रात्यक्षिकासह त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यासाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी प्रतिष्ठानचे अँड्र्यू फर्नांडिस, सिद्धेश मणेरीकर, तुषार पाबळे, सौरभ दांडगे यांनी कारागृहातील बंदीवानांना सर्वसंधी संचालन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम, ओंकार, सूर्यनमस्कार आदी योगप्रकाराबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक योगा प्रकाराचे आरोग्याबाबत महत्व, उपयोग आणि नियमित योगासने केल्याने होणारे लाभ सांगून सर्व बंदीवानांनाकडून योगाचे प्रकार करवून घेण्यात आले.यावेळी कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या योगा प्रशिक्षणात बंदिवान बंधूंसह तुरुंग अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

जनजागृतीसह शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात गेली १५ वर्षे सातत्याने उपक्रम राबवणाऱ्या सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदीवानही समाजाचाच भाग असल्याची जाणिव ठेवून सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. त्यात बंदिवानांच्या मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ, प्रबोधनासाठी व्याख्याने, खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रमांचा समावेश आहे. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रम राबविण्यात आले होते