५ ऑगस्ट वार्ता: सामाजिक माध्यमांद्वारे प्रसाद राजेंद्र पवार या ३० वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. या प्रकरणी राजाराम पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर प्रसाद पवार यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यातून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तरी यापुढे सार्वजनिक माध्यमांद्वारे पूर्वग्रहदूषितपणे दोन समाजात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या आधारे जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने संदेश प्रसारित केल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक माध्यमांचा वापर दायित्वाने करावा, असे आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी केले आहे.