सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला येथील प्रत्येक नागरिकाची काळजी आहे कारण येथील प्रत्येक नागरिकांचे जीवन हे अनमोल आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात वर्ष 24 तास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते येथील नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क असतात. त्यांची काळजी घेत असतात त्यामुळे असे उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात.
गेले कित्येक दिवसापासून श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठी रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा खड्डा पडला होता अपघात होण्याची शक्यता होती याचीच दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून रहदारी व पाऊस कमी झाल्यावर आज पहाटे दोन वाजता सिमेंट काँक्रेटने सदर खड्डा बुजवण्यात आला.
शाळकरी मुले व नागरिक रस्त्यावरून चालताना वाहनाचा टायर खड्ड्यांमधून जोरात जाताना चिखलाचं पाणी त्यांच्या अंगावर उडत होते तसेच सदर खड्डा अपघाताला कारण सुद्धा ठरत होता याची दखल घेऊन संस्थेचे सदस्य रवी जाधव यांच्या पुढाकारातून सदर खड्डा बुजवण्यात आला यासाठी सिमेंट,वाळू व खडी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील यांनी पुरवली तर संस्थेचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम, सुजय सावंत, सुरज धुरी व रवी जाधव यांनी यासाठी योगदान दिले. याही अगोदर शहरातील कित्येक धोकादायक खड्डे संस्थेच्या माध्यमातून बुजवण्यात आले होते.
शहरातील बाजारपेठ व शाळा- महाविद्यालय परिसरातील सर्व खड्डे पावसाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने बुजवण्याचा निर्धार येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केला आहे असे रवी जाधव यांनी सांगितले.