Home स्टोरी सामाजिक बांधिलकीचा निराधार व्यक्तीला आधार!

सामाजिक बांधिलकीचा निराधार व्यक्तीला आधार!

166

सावंतवाडी प्रतिनिधी: आज शनिवार २९ जुलै रोजी सावंतवाडी विठ्ठल मंदिरच्या मागच्या बाजूला असलेल्या जिन्याखाली गेले कित्येक दिवस सुरेश मिस्त्री वय वर्ष ६५ हा निराधार व्यक्ती राहत होते. सुरेश मिस्त्री यांच्या पूर्ण अंगाला जखमा झालेल्या असल्याने अंगाला दुर्गंधी येत होती. अशा अति वाईट अवस्थेत सुरेश मिस्त्री आजारी पडून होते. परंतु सुरेश मिस्त्री आज जास्त सिरीयस झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांना याची कल्पना दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, शेखर सुभेदार, अशोक पेडणेकर, निखिल जाधव, दुर्गेश रेगे व सामाजिक कार्यकर्ते बाबलो डिचोलकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सदर निराधार वृद्ध व्यक्ती पावसामध्ये भिजत बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते. त्यांना पाणी पाजवून शुद्धीत आणलं व त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्वच्छ आंघोळ घालून खाण्यासाठी चहा बिस्कीट दिले. त्यानंतर सदर वृद्ध व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर पोलिस कर्मचारी पी.एस.आय भागवत, होमगार्ड एस व्ही भांडीये, जीपी वेंगुर्लेकर यांच्या मदतीने ॲम्बुलन्सने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता सदर वृद्ध व्यक्तीची तब्येत चांगली आहे.

पोलीस सदर वृद्ध व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. असं समजलं की सदर वृद्ध व्यक्तीला दोन मुलगे आहेत व दोन्ही चांगल्या नोकरीला आहेत. परंतु स्वतःच्या बापावर अशी वेळ का येऊ द्यावी? हे दुर्दैव आहे. अशी खंत सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सदर वृद्ध व्यक्ती त्यावेळीचा बारावी पास आहेत असेही समजलं. उपचारानंतर सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेऊन सदर वृद्ध व्यक्तीला नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहेत. तोपर्यंत सदर वृद्ध व्यक्ती सामाजिक बांधिलकीच्या देखरेखेखाली आहे.