Home स्टोरी सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे निधन

सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे निधन

127

सावंतवाडी प्रतिनिधी:

माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे काल शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रात्रौ १ वाजण्याच्या दरम्याने राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षाचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्र, तसेच माजी सैनिक संघटना यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पी.एफ. डॉन्टस हे सैन्य दलामध्ये नोकरीला होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार खात्यामध्ये त्यांनी नोकरी केली. यावेळी प्रथम त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन केली. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ते कार्य करत होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली. दरम्यानच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास सुरुवात केले. ब्रिगेडिया सुधीर सावंत यांचे ते विश्वासू सहकारी होते. किंबहुना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या खासदारकीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेतचे अध्यक्ष होते. माजी सैनिकांसाठी सैनिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. तर आपल्या कॅथलिक बांधवांसाठी कॅथलिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. या दोन्ही संस्था आज जिल्ह्यातील अग्रणी संस्था म्हणून गणल्या जातात. त्याचे सर्व श्रेय पी.एफ. डॉन्टस यांना जाते. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली ची स्थापना त्यांनी केली. पंधरा वर्षांपूर्वी साप्ताहिक सरहद्द त्यांनी सुरू केले असून त्याचे संपादक स्वतः होते. याचबरोबर अनेक सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या असून त्या माध्यमातून त्यांनी शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्या व व्यवसाय करण्यास मदत केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून नातवंडे, बहीणी, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. उद्या सोमवारी साडेआठ वाजता त्यांच्या घराकडून त्यांची अंतयात्रा निघणार असून या अंतयात्रेमध्ये ख्रिश्चन बांधव, माजी सैनिक, सहकार खात्यातील त्यांची मित्र मंडळी सामील होणार आहेत. यावेळी सैनिक स्कूल आंबोलीचे विद्यार्थी त्यांना मानवंदना देणार आहेत. त्यानंतर दहा वाजता न्यू खासकीलवाडा येथील सेमिस्ट्रीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.