सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते (वय ९८) यांचे अल्पशा आजारामुळे ३० जून या दिवशी पुणे येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले आणि २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कॅप्टन मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या घरातील ७ पिढ्यांनी भारतीय सैन्य सेवेत योगदान दिले आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकार्यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय सैन्यामध्ये आपले नाव अजरामर केले आहे. कॅप्टन हंबीरराव स्वतः ‘मराठा लाइट इन्फंट्री’च्या वतीने वयाच्या २० व्या वर्षी दुसर्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टॅंक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती.