Home स्टोरी ‘सम सकला पाहू’ या भावनेतून सेवाकार्य करा : गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

‘सम सकला पाहू’ या भावनेतून सेवाकार्य करा : गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

112

 

नाशिक प्रतिनिधी: ‘सम सकला पाहू’ या भावनेतून सेवेकर्‍यांनी सेवाकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट करुन गुरुमाऊलींना प्रतिसाद दिला.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात शनिवारी (23 सप्टेंबर) मासिक महासत्संग पार पडला. यावेळी गुरुमाऊलींनी आध्यात्मिक सेवांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गुरुमाऊली म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ‘गावाकडे चला’ असा नारा दिला. कारण त्यांना कल्पना होती की गावे समृद्ध झाली की देश समृद्ध होईल. आज याच धर्तीवर सेवामार्गातर्फेे गावे सशक्त करण्यासाठी ग्रामअभियान राबवण्यात येते. ग्रामअभियान हा सेवामार्गाचा कणा आहे. या अभियानाच्या माध्यमातून दु:खी, कष्टी, पीडित लोकांसाठी निष्काम भावनेतून कार्य केले जाते. असे स्पष्ट करुन गुरुमाऊली पुढे म्हणाले की, गुरुपीठात झालेले संकल्पित नवनाथ पारायण आणि सेवेकर्‍यांच्या सेवेमुळे पर्जन्यराजाला पुंन्हा यावे लागले. त्यामुळे सेवेकर्‍यांनी पर्जन्यसूक्तांची सेवा अखंड सुरुच ठेवावी. आदर्श, सुसंस्कारित, निर्व्यसनी पिढी घडविणे ही काळाची गरज असली तरी हे खूप मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी गर्भ-शिशू-मूल्यसंस्कार विभागाने अधिकाधिक झोकून देऊन सेवाकार्य करण्याची आवश्यकता आहे. जगभरात दु:खी, कष्टी, रोगी, पीडित, बाधित, शापित आणि अज्ञानी लोकांची संख्या प्रचंड आहे. त्याकरिता प्रश्नोत्तर विभागाने आपल्या कार्याचा जास्तीत जास्त विस्तार करणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या आहारात मीठ, साखर, तेल, तिखट या पदार्थांचा कमीतकमी वापर करुन रानभाज्यांचा समावेश केल्यास आरोग्य निरामय राहील त्याचबरोबर वर्षातून एकवेळ आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग म्हणचे पंचकर्म केल्यास कोणतेही आजार फिरकणार नाहीत. रुग्णांच्या सेवेसाठी परमपूज्य सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हॉस्पिटलचे काम लवकर व्हावे यासाठी हॉस्पिटलच्या जागेवर भैरवचंडीची सेवा करणारे सेवेकरी महत् भाग्यवान ठरतात.छत्रपती संभाजीनगर येथे 27 नोव्हेंबर रोजी मूल्यसंस्कार मेळावा आणि राष्ट्रकल्याणासाठी मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर 1 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय सत्संग आयोजित करण्यात आला आहे. या दोंन्ही मेळाव्यांसाठी सेवेकर्‍यांनी योगदान द्यावे.

आपल्या पितरांची विधी माहीत नसल्यास सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी महालयात श्राद्ध विधी करावा असे शास्त्र सांगते. नवीन पिढीला पितरांची सेवा, जयंती आणि पुण्यतिथी यांचे महत्त्व अवश्य सांगावे. श्री स्वामी महाराजांच्या सेवेने सेवेकरी ऊर्जावान होतो. ही ऊर्जा ग्राम अभियान राबविण्यासाठी खर्च करा. सेवामार्गाचे अंतरंग ग्रामअभियानाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. अज्ञानी लोकांचे भले व्हावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भूकंपशांती यंत्र, वादळशमन ध्वज, स्वसंरक्षण यंत्र, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र यांचे महत्त्व सांगणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे उपयायोजना केल्यास आजारपण आणि कर्ज यांना पायबंद घालता येणे शक्य आहे. तसेच गुरुपीठातून सिद्ध करुन घेतलेल्या श्रीयंत्र व रुद्रयंत्राच्या सेवेतून अनुक्रमे आर्थिक स्थिरता आणि निरामय आरोग्याचा लाभ मिळतो. रानभेंडी, वेखंड, सप्तरंगीची मुळी आणि काढा यांचा वापर केल्यास कॅन्सरसारखा असाध्य आजार बरा होतो. सोबत आहारातून वांगी, मिरची, उडीद, मका हे पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे असे गुरुमाऊलींनी नमूद केले.

 

‘मूल्य संस्कारातून सर्वांगीण विकास’

प्रात्याक्षिक प्रशिक्षण उत्साहात !

 

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख आ. श्री. नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार सभागृहात महासत्संगाच्या पर्वावर ‘मूल्यसंस्कारातून सर्वांगीण विकास’ या महत्त्वपूर्ण विषयावर प्रात्याक्षिक प्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या प्रदर्शनात सेंद्रिय शेतीचे महत्त्व, शेती व खताचे प्रकार, शेती पूरक व्यवसाय यांची माहिती देणारे स्टॉल्स, सात्त्विक आहार आणि आरोग्याला अपायकारक विरुद्ध आहार व त्याचे दुष्परिणाम, योगासने – सूर्यनमस्काराचे महत्त्व, शारीरिक व मानसिक लाभ मिळवून देणारे पारंपरिक खेळांचे प्रकार यांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. परमपूज्य गुरुमाऊलींनी या प्रदर्शनाला भेट देऊन मूल्यसंस्कार विभागाचे कौतुक केले. यावेळी गुरुपुत्र आ. चंद्रकांतदादा, आ. नितीनभाऊ, आ. आबासाहेब हेही उपस्थित होते.