५ जुलै वार्ता: समृद्धी महामार्गावर १ जुलैच्या पहाटे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेच्या तब्बल ९ तासांनंतर ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ अर्थात PUC देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. १ जुलै रोजी पहाटे १ वाजून ३२ मिनिटांनी बसला अपघात झाला आणि त्यानंतर त्याच दिवशी यवतमाळ येथील एका PUC केंद्रावरून सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी ‘PUC’ प्रमाणपत्र जारी करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘वाहन डेटाबेस’वरही हे प्रमाणपत्र पहाता येते. या गंभीर प्रकारावर परिवहन विभाग काय भूमिका घेणार हे आता खूप महत्वाचे आहे. यावरून राज्यात ‘बोगस’ PUC प्रमाणपत्राचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा होत आहे.