सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सनातन धर्मावर टीका करणार्या ‘डी.एम्.के.’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आला. सनातन धर्मावर टीका करणार्या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील, तर ‘इंडिया’ आघाडी कशासाठी निर्माण झाली, हे स्पष्ट आहे. सनातन आणि हिंदु धर्म संपवण्यासाठी ही आघाडी निर्माण झाली आहे, असा आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी १३ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केला.ते पुढे म्हणाले की, मराठ्यांच्या हिंसक आंदोलनामागे ज्येष्ठ पत्रकार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक आहेत. यथावकाश त्याचेही पुरावे मिळतील. मराठा आंदोलनाच्या आडून जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलेे. सरकार यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. जरांगे पाटील यांना समाजाचे हित कशात आहे ?, हे ठाऊक आहे. सरकारशी चर्चा करून समाजाला लाभ होईल. याचा ते निश्चितच विचार करतील. महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करणार्यांच्या हातात आपण काही गोष्टी देऊ नये, याचा विचार जरांगे पाटील यांनी करावा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवावा. कुठल्याही समाजाला कुठलीच अडचण येणार नाही. ते न्याय देतील.