Home स्टोरी सनदी अधिकार्‍यांना देणार छत्रपती शिवरायांच्‍या राजकारभाराचे धडे!

सनदी अधिकार्‍यांना देणार छत्रपती शिवरायांच्‍या राजकारभाराचे धडे!

78

८ जुलै वार्ता: राज्‍यातील सनदी अधिकार्‍यांना छत्रपती शिवरायांच्‍या राजकारभाराचे धडे दिले जाणार आहेत. शिवरायांच्‍या राजकीय कारकिर्दीतील अनुभव, कार्य आणि संदर्भ यांचे संकलन, संपादन आणि प्रकाशन करण्‍यासाठी राज्‍यशासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’ स्‍थापन केली आहे.७ जुलै या दिवशी शासन आदेश काढला आहे. सनदी कर्मचारी, व्‍यवस्‍थापकीय अभ्‍यासक, वास्‍तूविशारद, कायदेतज्ञ आणि अर्थतज्ञ यांना उपयोगी होईल, अशा स्‍वरूपात शिवरायांच्‍या जीवनातील अनुभव, दस्‍ताऐवज यांचे संकलन ही समिती करणार आहे. या समितीमध्‍ये सांगली येथील डॉ. केदारनाथ फाळके, डॉ. उदय कुलकर्णी, पुणे येथील सचिन मदगे, डॉ. अनुराधा कुलकर्णी, सुधीर थोरात आणि डॉ. अजित आपटे यांचा समावेश आहे.या समितीद्वारे संकलित करण्‍यात आलेली माहिती शासनाकडून पुस्‍तकरूपाने प्रकाशित करण्‍यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यकर्तृत्‍व आणि राजकीय, सामाजिक प्रयोगांचा आदर्श महत्त्वाचा आहे. भारतीय प्रशासन आणि समाजजीवन यांमध्‍ये पालट घडवून आणणार्‍या शिवरायांचे चरित्र, कार्य नवी पिढी अन् राज्‍यकर्ते यांना प्रेरणादायी आहेच; परंतु सनदी कर्मचार्‍यांसह अन्‍य वर्गांनाही त्‍याचा उपयोग होईल, असे शासनाच्‍या आदेशात म्‍हटले आहे.