मसुरे प्रतिनिधी: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ची माहिती मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी एक दिवशी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे करण्यात आले आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन चे प्रतिनिधी शेतकऱ्यांना सत्यमेव जयते वॉटर कप बाबत सविस्तर माहिती देणार आहे. तरी या कार्यशाळेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी आपल्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली श्री उमाकांत पाटील व तालुका कृषी अधिकारी मालवण श्री अमोल करंदीकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये पिण्यासाठी त्याचबरोबर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांना मदत म्हणून अनेक अशासकीय संस्था पुढे आल्या. अभिनेते अमीर खान यांची पाणी फाउंडेशन ही संस्था त्यापैकीच एक अग्रगण्य नाव. सन 2016 पासून सुरुवात करून सुरुवातीस केवळ तीन गावांमध्ये वॉटर कप ही स्पर्धा घेण्यात आली. आता 2024 जवळपास 24500 गावापर्यंत हे काम पोहोचले आहे. परंतु कोकण विभागाचा त्यामध्ये समावेश नव्हता.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेवरून पाणी फाउंडेशन ने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामविकास विभाग यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये 2026 पासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये आता कोकणातील शेतकरी गट सुद्धा सहभागी होऊ शकणार आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्या बरोबरच श्रमदान हा सुद्धा महत्त्वाचा घटक यामध्ये ठेवण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे.
शेतकऱ्यांचे संघटन करणे तसेच त्यांना उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था याने विकसित केलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी उद्युक्त करणे, हवामान अनुकूल शेती पद्धतीसाठी प्रशिक्षण देणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा वापर वाढविणे अशी अनेक उद्दिष्टे या फार्मर कप स्पर्धेमध्ये ठेवण्यात येणार आहे.







