२ ऑगस्ट वार्ता: संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही, अशा गलिच्छ शब्दांमध्ये या नालायक माणसाने वक्तव्य केलं आहे. त्यांचे शब्द ऐकले, तर असेल तिथून त्यांना उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे. बहुजनांचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रपित्याचा अपमान करणं, त्याहीपलीकडे जाऊन जिथे स्वत: या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले, त्या साईबाबांचा अपमान केला जात आहे. या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांचाही अपमान या नालायक माणसानं केलं आहे. यावरूनच या माणसाची लायकी दिसते. त्याची जागा कोठडीत आहे. त्याच्यावर कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे. या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलमध्ये टाकणार आहात? नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.