१३ जून वार्ता: नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही. असा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. आळंदीत एका खोलीत कोंडून झालेली मारहाण अर्थात वारकऱ्यांवर झालेला हल्ला हा शिंदे-फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे. वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागा”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी केली आहे.
आळंदी देवस्थानकडून कालच्या घटनेवर भूमिका मांडण्यात आली आहे. “काल घडलेल्या घटनेत आळंदी देवस्थानचा संबंध नव्हता. आनंदाच्या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. कालचा प्रकार हा गैरसमजतीतून झालाय. एकूण 47 दिंड्या आहेत, त्यामधील 75 वारकऱ्यांना पास दिले होते”, अशी प्रतिक्रिया आळंदी देवस्थानकडून देण्यात आलीय.“वारकरी शिक्षण संस्थेतीलही मुलांनाही देवस्थानचे पास दिले होते. मात्र अधिक संख्या असल्याने त्यांनी हट्ट घातला. मुलं वारकरी म्हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत होते चुका शोधत बसण्यापेक्षा सुधारणा करूयात. याचं कोणीही राजकारण करू नये”, असं आवाहन आळंदी देवस्थानकडून करण्यात आलंय.