संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात काल दोन गटात तुफान राडा झाला. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले. यावेळी दगडफेक करण्यात आली. 20 वाहनांची जाळपोळ करण्यात आलीसंभाजीनगर : संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटातक धक्का लागल्याने झालेल्या वादाचं पर्यवसान तुफान राड्यात झालं. धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली. दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही या जमावाने टार्गेट केलं. पोलिसांवर दगडफेक करतानाच पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. या राड्यात तब्बल 20 वाहने जाळण्यात आली आहेत. काल रात्री ही घटना घडली. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. रामनवमी आणि रमजानमुळे किराडपूर परिसरासह औरंगाबादेतील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात हा प्रकार घडला. काल रात्री 12.30 वाजता गाडीला धक्का लागल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. त्यातून प्रकरण हाणामारीवर गेलं. त्यानंतर दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काहीवेळाने हा तणाव निवळला. त्यानंतर पुन्हा समाजकंटकांचा एक गट आला आणि त्यांनी पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात करत दगडफेक केली. त्यामुळे दुसऱ्या गटाकडूनही त्यांनी प्रत्युत्तर म्हणून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटाकडून खासगी वाहने जाळण्यास सुरुवात झाली. यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. पण जमावाने पोलिसांचीच वाहने पेटवून दिली. त्यामुळे तणाव अधिकच वाढला. शेवटी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आणि जमाव पांगण्यात आला.20 वाहने जळून खाक या राड्यात दुचाकी आणि चारचाकी अशी 20 वाहने जळून खाक झाली आहेत. यात पोलिसांच्या 10 ते 12 गाड्यांचा समावेश आहे. पोलिसांनी पहाटे पहाटेच या जळालेल्या गाड्या घटनास्थळावरून हटवल्या आहेत. गाड्या जळाल्याने संपूर्ण कोळसा झाला होता. गाड्यांची ही राखही हटवण्यात आली असून रस्ता धुवून काढण्यात आला आहे. तसेच या परिसरात पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज रामनवमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शहरातील संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अफवांना बळी पडू नका
या दरम्यान घटनेवर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास दोन गटात किरकोळ भांडण झालं होतं. मोटरसायकलचा धक्का लागल्याचं दोन गटात बाचाबाची, धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही लोक गोळा झाले. त्यांनी घोषणाबाजी केली. नंतर समाजकंटक गोळा झाले त्यांनीही उपद्रव सुरू केला. पोलिस घटनास्थळी जमाव पांगवण्यासाठी आले असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या जमावाने पोलिसांच्या गाड्या जाळल्या. त्यामुळे आम्ही अधिक कुमक आणून बलप्रयोग करून जमाव पांगवला, असं सांगतानाच कुणीही अफवांना बळी पडू नका, असं आवाहन निखिल गुप्ता यांनी केलं आहे.
सीसीटीव्ही पाहून कारवाई करा
खासदार इम्तियाज जलील यांनीही शांततेचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करावं. ड्रग्सचा कारभार करणाऱ्यांना अटक करावी. सीसीटीव्ही पाहून कारवाई करा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. तर विकृत लोकांनी दंगल करण्याचा प्रयत्न केला. राममंदिराचं नुकसान झालं नाही. राम मंदिराला कोणतीही इजा झाललेली नाही, असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.