Home स्टोरी संतप्त ग्राहकांची सावंतवाडी येथे बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधक कार्यालयाला धडक!

संतप्त ग्राहकांची सावंतवाडी येथे बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधक कार्यालयाला धडक!

120

२२ जून वार्ता: सावंतवाडी येथे बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधक कार्यालयाला येथील सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून धडक देण्यात आली. पावसाळा सुरु झालेला असल्याने व बांद्यात पूर समस्या उद्भवत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल सेवा सुरू राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच बांधा शहरातील टॉवरवर आजूबाजूची १८ गावे तसेच संपूर्ण दोडामार्ग तालुका अवलंबून आहे. त्यामुळे लाईट गेल्याने टॉवर बंद होऊन मोबाईल सेवा बंद होते अशावेळी आकस्मिक परिस्थितीत आरोग्य सेवा मिळवण्यासाठी देखील मोबाईलचा वापर करता येत नाही. त्याचप्रमाणे बांदा शहरातील सर्व बँका या केवळ बीएसएनएलच्या सेवेवर अवलंबून असल्याने येथील बँकेच्या ग्राहकांना देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यावर ग्राहकाने यूपीआय पेमेंट केल्यास त्या संदर्भात सूचना संदेश देखील मोबाईल वरून व्यापाऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील याचा प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. आता विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन अभ्यास करत असल्याने अशा विस्कळीत सेवेमुळे त्यांच्या अभ्यासावर देखील याचा परिणाम होत आहे. तसेच बांदा परिसराच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील अॅपद्वारे शेती व पाऊस, हवामान या सर्वांबाबत माहिती घेता येत नाही.बांदा येथे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या ही खूप मोठी आहे, त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना या विस्कळीत सेवेचा फटका बसतो आहे.

बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा बंद होत आलेली असून तीच सेवा खाजगी कंत्राटदाराला दिल्यावर त्याच्याकडून मात्र अगदी योग्यरीत्या सेवा पुरवली जाते याचा सरळ अर्थ बीएसएनएल कडून कामाचे योग्य नियोजन न करता बेजबाबदारपणे काम केले जाते असे देखील अधिकाऱ्यांना सुनावले गेले.ग्राहकांना योग्य सेवा देणे दूरसंचार निगमला शक्य नसल्यास याबाबत कंत्राटदार नेमून त्याच्यामार्फत नियोजन केले जावे असेही सांगण्यात आले.आज इतर सर्व खाजगी कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देतात, परंतु बीएसएनएलची सेवा गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, या अशा कारणांमुळेच आज बीएसएनएलच्या सावंतवाडी येथील उप महाप्रबंधक श्री.जानु व अधिकारी श्री. सुधीर देशमुख यांना याबाबत जाब विचारण्यात आला व ही सेवा किती दिवसात सुरळीत सुरू होईल याबाबत आठ दिवसात लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे सांगण्यात आले. यावेळी निगुडे माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांच्याकडून शेर्ला, मडुरा व निगुडे पंचक्रोशीतील बीएसएनएलच्या नेटवर्क संदर्भातील नागरिकांच्या समस्या देखील मांडल्या. तसेच कास येथील बंद असलेल्या टॉवरवरून अधिकाऱ्यांना जाब विचारला.