१५ जुलै, नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या सातपूर भागातील उदयनगर सेवाकेंद्रात बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागप्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 16 जुलै रोजी जिल्हास्तरीय ‘सेल्फ डिफेन्स’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागातर्फे संपूर्ण राज्यभर सेवाकेंद्रांमध्ये सेल्फ डिफेन्स अर्थात स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ नाशिक मधील उदयनगर केंद्रापासून होत आहे. संपूर्ण दिवसभर दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रारंभी सकाळी 9 वाजता श्रीदुर्गा सप्तशतीचा सामुदायिक पाठ घेण्यात येणार आहे. सकाळी साडेदहाच्या आरतीनंतर गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांचे ग्राम व नागरी अभियानाचे नवे स्वरुप आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर प्रशिक्षित प्रतिनिधींकडून सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक प्रशिक्षणाला सुरुवात होईल. या अंतर्गत हल्लेखोरांपासून बचाव कशापद्धतीने करावा, स्वसंरक्षणाची स्टिक कशाप्रकारे हाताळावी, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बालक, युवती, आणि महिलांसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण असून ग्राम व नागरी विकासाच्या अभियानाचे नवे स्वरुप या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण होणार आहे.
दुपारच्या सत्रात सेवामार्गाच्या अठरा विभागांच्या स्टॉलची मांडणी, युवा प्रबोधनावर आणि स्तोत्र-मंत्र संशोधनावर प्रेझेंटेशन होणार आहे. तरी या बहुमूल्य उपक्रमाचा सेवेकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागाने श्रीगुरुपीठावर राज्यभरातून आलेल्या 108 प्रतिनिधींना स्वसंरक्षण, लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले होते. आता संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय सेवाकेंद्रामध्ये सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण घेतले जाणार आहे.