मसुरे प्रतिनिधी:
समाजातील दानशूर व्यक्तीमुळे मी चांगले शिक्षण घेऊन सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच संगणक क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकलो. ज्या समाजामुळे मी शिकू शकलो त्या समाजाचे देणे लागतो या भावनेने मी हे समाजसेवेचे काम करत आहे. या शाळेतील सर्व मुले खूप हुशार आहेत. मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे. या भाषेतून शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही संगणक शिक्षण उत्तम प्रकारे घेऊ शकता. प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांच्यामुळे आपला संपर्क आला व आज ही शाळा संगणक दृष्ट्या अद्यावत झालेली आहे असे प्रतिपादन पुणे येथील संगणक अभियंता संतोष विसाळ यांनी श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे केले.
पुणे येथील पर्सिस्टंट कंपनीच्या वतीने प्रशालेला २४ संगणक सीपीयू नुकतेच भेट देण्यात आले. या सर्व सीपीयूंची जोडणी करून सर्व संगणक श्री विसाळ यांनी चालू स्थितीत आणले. तसेच प्रत्येक वर्गात इंटरनेट सुविधा सुद्धा त्यांनी करून दिली. यासाठी मुणगे येथे पाच दिवस मुक्काम संतोष विसाळ याना करावा लागला. त्यांच्या या योगदान बद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यवस्थापक देवदत्त पुजारे म्हणाले, विसाळ सर यांनी यापुढेही प्रशालेला त्यांची गरज लागेल त्यावेळी आपला वेळ द्यावा. आज समाजामध्ये पैसे देणारे दानशूर व्यक्ती खूप आहेत, परंतु आपला वेळ देणारी माणसं फार कमी आहेत. आणि हा वेळ विसाळ सरांनी या प्रशालेसाठी मागील पाच दिवस दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. शाळा समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक संजय बांबुळकर यांनी पर्सिस्टंट कंपनी तसेच संतोष विसाळ यांचे सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानले. यावेळी संतोष विसाळ यांचा शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापिका एमबी कुंज, प्रसाद बागवे, प्रणय महाजन, गौरी तवटे, एन. जी. वीरकर, हरीश महाले, सौ कुमठेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रियांका कासले, सौ मिताली हिर्लेकर, झुंजार पेडणेकर, स्वप्नील कांदळगावकर, एन. एल. बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू, संतोष मुणगेकर,
आदि उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे आणि आभार सौ कुमठेकर यांनी मानले.