१३ जून वार्ता: मुंबई आणि दिल्लीतील श्रद्धा-सरस्वती हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशातही २१ वर्षीय मनोहरचा खून केल्यानंतर मृतदेहाचे ७-८ तुकडे केले आणि नंतर मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकून दिला. याप्रकरणी सध्या पोलिसांनी दोन मुली आणि त्यांच्या एका भावाला अटक केली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. चंबाचे एसपी अभिषेक यादव यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंबा येथील बांदल गावातील हे प्रकरण आहे. ९ जून रोजी तरुणाचा मृतदेह सापडला होता. मनोहर हा युवक ६ जूनपासून बेपत्ता होता.
हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. तरुण आणि तरुणीची चांगलीच ओळख होती. मात्र मुलीच्या घरच्यांना ते आवडलं नाही. तरुणाची हत्या केल्यानंतर मुलीच्या भावाने त्याच्या मृतदेहाचे ८ तुकडे केले आणि नंतर हे तुकडे गोणीत ठेवले, असा आरोप आहे. नंतर आरोपींनी गोणी नाल्यातील दगडाखाली गाडली. ९ जून रोजी काही लोक तिथून जात असताना त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तपासात मनोहरच्या मृतदेहाचे काही भाग गोणीतून सापडले आहेत.