Home राजकारण “शिवसेनेचा सौदा करायचा हे दिल्लीने आधीच ठरवलं होतं, त्यामध्ये निवडणूक आयोगाने….” संजय...

“शिवसेनेचा सौदा करायचा हे दिल्लीने आधीच ठरवलं होतं, त्यामध्ये निवडणूक आयोगाने….” संजय राऊत यांचा घणाघात..

72

निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने ठाकऱ्यांची शिवसेना शिंद्यांची झाली. त्या शिवसेनेचा पसारा डोक्यावर घेऊन श्रीमान शिंदे किती तग धरणार? शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण गेल्या ५० वर्षांपासून आहे. ते जगाला समजले आहे. मात्र निवडणूक आयोगाला समजले नाही. निवडणूक आयोगाने डोळे मिटून शिवसेना हे नाव, चिन्ह, धनुष्यबाण हे फुटीर शिंदे गटाला दिले. तरीही त्यांना कुणी शिवसेना मानायला तयार नाही. असंही म्हणत खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या आपल्या सदरातून निवडणूक आयोगावर आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलं?..

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दाद मागण्यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहचली. खरी शिवसेना आमचीच हे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे यांना सिद्ध करावे लागते हे महाराष्ट्राचे आणि न्याय व्यवस्थेचे दुर्दैव आहे. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळावं म्हणून एकनाथ शिंदे यांनी २ हजार कोटी मोजले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी आधीच केला आहे. त्यानंतर आजच्या रोखठोक या सदरात त्यांनी शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बेइमान गटाच्या हातात गेल्याने महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. देशातल्या न्यायप्रिय जनतेला धक्का बसला आहे. लोकशाहीचा खून कसा होतो ते निवडणूक आयोगाने दाखवून दिले आहे. शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी पक्ष सोडला. ही विधीमंडळ पक्षातली फूट होऊ शकते. आमदार, खासदारांनी पक्ष सोडल्याने पक्ष त्यांच्या मालकीचा होत नाही. मात्र आपल्या विद्वान निवडणूक आयोगाने या फुटलेल्या आमदार-खासदारांची मतं मोजून निर्णय दिला. महाराष्ट्रातले शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, इतर लोकप्रतिनिधी यांना मिळालेली मतं का मोजली नाहीत? शिवसेनेच या फुटिरांना उमेदवारी दिली आणि निवडून आणले हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले नाही का? की सत्य झाकून निर्णय द्यायचा होता आणि दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनीच तसे आदेश दिले होते असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना विकण्याचा आणि विकत घेण्याचा निर्णय दिल्लीने आधीच घेतला होता. त्या सौद्यात निवडणूक आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली. एवढं होऊनही त्यांना कुणीही शिवसेना मानायला तयार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे बॉस नरेंद्र मोदी यांनी सुडाच्या आणि बदल्याच्या राजकारणातूनच शिवसेनेवर इतिहासातील भयंकर हल्ला झाला. अमित शाह यांच्या अहंकारातून सगळे घडले. २०१९ वर्षाला भाजपाची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला कारण भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यातून महाराष्ट्रात नवं महाभारत घडलं. शिवसेनेने दगा दिला, जनदेशाचा अपमान केला, असे आरोप अमित शाह यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांनी केले. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केलेला नाही. जर तो अपमान असेल तर मग काश्मीरमध्ये महबुबा मुफ्तींसोबत हात मिळवला तेव्हा जनादेशाचा अपमान झाला नाही का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.