Home स्टोरी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला लावले मुदत संपलेल सलाईन.., ग्रामस्थ संतप्त..! कारवाईची मागणी

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला लावले मुदत संपलेल सलाईन.., ग्रामस्थ संतप्त..! कारवाईची मागणी

122

वेंगुर्ले: शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात काल बुधवारी २१ रोजी २३ वर्षीय युवती उपचारार्थ दाखल झाली असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये मुदत संपलेली सलाईन त्यांना लावली आणि त्यानंतर त्यांचा त्रास वाढू लागला. याबाबत माहिती मिळताच शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांच्यासाहित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर आज याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातून एका रुग्णावर उपचार करताना सोडियम क्लोराइड इंजेक्शन (सलाईन) चा वापर केला गेला ते फेब्रुवारी २०२४ मध्ये मुदत संपलेलं असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी वापरासाठी अशी नोंद असलेल्या *या इंजेक्शनवर मार्च २०२२ अशी उत्पादन तारीख असून फेब्रुवारी २०२४ ही मुदतपूर्तीची तारीख असल्याचे दिसते*. ज्या सरकारी रुग्णालयांवर गोरगरीब रुग्ण अवलंबून असतात अशा जबाबदार रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे होणारी बेपर्वाई म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.

हा प्रकार दि.२१ रोजी सायंकाळी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात घडला. यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य नंदिनी धानजी, रश्मी डीचोलकर, मयुरेश शिरोडकर यांच्यासाहित ग्रामस्थांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले तसेच उर्वरित सर्व औषधसाठा तपासण्याची मागणी केली. तसेच वरिष्ठांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच आज सायंकाळ पर्यंत कारवाईचे लेखी आदेश दिले नाहीत तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.