औरंगाबाद: शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आमदार प्रशांत बंब हे येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा शिक्षक, शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार विरुद्ध आमदार प्रशांत बंब असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आमदार बंब यांनी शिक्षकांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाल्यानं मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचीही मोठी अडचण झालीय. विशेष म्हणजे 5 सप्टेंबर रोजीच्य मोर्चात पालकही सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी हाच मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. मुख्यालयाचा ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी देखील आमदार बंब यांच्याकडून सतत केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये बंब यांच्याबद्दल रोष पाहायला मिळाला होता. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आमदार बंब यांच्याविरोधात आंदोलन देखील केले होते. मात्र, मागील काही दिवसांत हा मुद्दा मागे पडला असल्याचे चित्र असतानाच आता बंब पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.