Home शिक्षण शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक…! राज्य शासनाचा निर्णय.

शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक…! राज्य शासनाचा निर्णय.

123

१ जून वार्ता: शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी दृष्टिकोनातून राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय हाती घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात, वर्गांच्या दरवाज्यांजवळ, प्रवेशद्वार, मैदाने आणि स्वच्छतागृहांच्या बाहेरील भागात हे कॅमेरे लावले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालता येणार आहे. शाळांना किमान एक महिन्याचा सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे आवश्यकता भासल्यास फुटेज तपासून पोलिसांना योग्य वेळी योग्य ती कारवाई करता येईल.

त्यांचप्रमाणे आता शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वी  त्यांचे पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शाळेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल.  गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना शाळेत प्रवेश किंवा नोकरी मिळणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास, त्याची सेवा तत्काळ समाप्त केली जाईल. या नियमामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांवर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढेल. याशिवाय, शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.