Home स्टोरी शहीद वैभव भोईटेंना अखेरचा निरोप!

शहीद वैभव भोईटेंना अखेरचा निरोप!

131

२२ ऑगस्ट वार्ता: लडाख येथील लेहजवळ वाहन अपघातात हुतात्मा झालेले जवान वैभव संपतराव भोईटे (वय २३) यांना भोईटेवस्ती, राजाळे (ता. फलटण) येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

वैभव भोईटे यांचे वडील संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दीड वर्षाची मुलगी हिंदवीने भडाग्नी दिला. यानंतर खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, राजाळे सरपंच स्वाती दोंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसो काळे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जिल्हा सैनिक मंडळ, कमांडिंग ऑफिसर ३११ मीडियम रेजिमेंट, कमांडिंग ऑफिसर २४ मराठा, कर्नल ऑफ दि रेजिमेंट मराठा, जी ओसी महाराष्ट्र ॲण्ड गोवा, जी ओसी डीएम ॲण्ड जीएस एरिया, जीओसी इन सी हेडक्वार्टर साऊथर्न कमांड, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, मेकनाईझ रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर पोलिस प्रशासन व सैन्य दलाच्या वतीने प्रत्येकी तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

लडाखमधील लेह जिल्ह्यात राजधानी लेहजवळ क्यारी गावातून जाताना भारतीय लष्कराचे  वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जवान हुतात्मा झाले.