Home राजकारण ‘शशिकांत वारिसेची हत्या करणारा नारायण राणे-निलेश राणे यांच्या सोबत राहणारा गुंड’, ‘या’...

‘शशिकांत वारिसेची हत्या करणारा नारायण राणे-निलेश राणे यांच्या सोबत राहणारा गुंड’, ‘या’ नेत्यानं थेट नाव घेत आरोप केला

88

अजित पवार यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले,  हा अपघात दाखवला गेला आहे. याचा मास्टरमाइंड कोण आहे? हे कळलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यामागे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चिथावणी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही वारिसे यांच्या हत्येवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही गृहखातं काय झोपा काढतंय का, असा सवाल विचारलाय. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना पक्कं माहिती आहे. त्याचं नाव समोर येऊ द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. तर विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचं नाव घेऊन नेमका संशय कुणावर आहे, हे उघड केलंय. दरम्यान, वारिसे यांचा अपघात नसून घातपातच आहे. या प्रकरणी दोषीला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज रत्नागिरीत आंदोलन होत आहे.

शशिकांत वारिसे यांचा सोमवारी रात्री एका एसयुव्ही कारने धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

विनायक राऊत काय म्हणाले?

विनायक राऊत म्हणाले, पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात झाला. त्याचा आम्ही आधीच धिक्कार केला आहे. तो गरीब पत्रकार. कोणत्याही रिफायनरीच्या अमिषाला बळी न पडता न्यायासाठी लढणारा असा पत्रकार होता… वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तपास करावा. हे सऱ्हाइत गुन्हेगार आहेत… यापूर्वीही अनेक प्रकार केले आहेत. कुंभवड्याला मनोज मयेकर नावाचा तरुण होता. त्याच्याही पाठिमागे गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘रिफायनरीच्या पैशांवर पोसणारे गुंड’

विनायक राऊत म्हणाले, ‘रिफायनरीच्या पैशांवर पोसणाऱ्या गुंडाचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपचे केद्रीय मंत्री याने सी वर्ल्ड, रिफायनरीच्या विरोधात येणाऱ्यांची गय करू नका, प्रसंगी पोलीस बळाचा वापर करा. हे दोन्ही प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. नारायण राणे, निलेश राणेंच्या बरोबर राहणारा हा गुंड आहे. त्यांच्याच चिथावणीमुळे वारिसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय.

रिफायनरी विरोधकांचा कोकणात मोर्चा

पत्रकार वारिसे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी नाणार रिफायनरी विरोधकांनी आज कोकणात मोठा मोर्चा काढला. राजापूर तहसील कार्यालयावर रिफायनरी विरोधी संघटनेचे कार्यकर्त जमले. वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू मागील सूत्रधार नेमका कोण? शोध घ्या, अशा घोषणा देत आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला. यावेळी नाणार प्रकल्पाचाही त्यांनी निषेध नोंदवला.

वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा

पत्रकारांचीही अवस्था अशी झाली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं. पत्रकार वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले,  हा अपघात दाखवला गेला आहे. याचा मास्टरमाइंड कोण आहे? हे कळलं पाहिजे. वस्तुस्थिती कळली पाहिजे. महत्त्वाच्या लोकांबाबतीत असं घडत असेल तर सामान्यांचं काय? कायदा सुव्यवस्था कशी राहणार आहे. याचा तपास लागला पाहिजे, याबद्दल २७ तारखेपासून होणाऱ्या बजेट अधिवेशनात आवाज उठवणार आहोत.