वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आज वर्धेत विविध कार्यक्रमांसाठी आगमन होत आहे. पण माजी खासदार सुबोध मोहिते यांच्या संयोजनात होत असलेल्या राजकीय कार्यक्रमात त्यांचाच प्रभाव दिसून येत असल्याने गटबाजीचे सावट या दौऱ्यावर दिसून येत आहे. दुपारी १२.०० वाजता पवार नागपुरातून थेट सेवाग्रामला येत असून, याठिकाणी वनहक्क प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या संमेलनास ते हजर राहतील. पुढे २.०० वाजता ते दुर्गा चित्रपटगृहात आयोजित व्यापारी सभेस मार्गदर्शन करतील. त्यानंतर सर्कस ग्राऊंडवर होणाऱ्या पक्ष मेळाव्यास ते संबोधतील. हे दोन्ही कार्यक्रम मोहिते यांच्या नेतृत्वात होत आहेत. अतिशय नेटाने तयारी करताना मोहिते यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली. विविध तालुक्यांतून लोकांना आणण्यासाठी स्वतः गाड्या पाठविल्या आहेत. शहरात लागलेल्या फलकावर सबकुछ मोहिते असून, ज्येष्ठ नेते प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत दिसेनासे स्वरुपात उमटले आहेत. स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून मोहिते आयोजनात सक्रिय असल्याने नाना तर्कांना उधाण आले आहे.