Home स्टोरी वेंगुर्ले येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर तब्बल ८५ गुंठे जमीन ! शासनाने घेतली...

वेंगुर्ले येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर तब्बल ८५ गुंठे जमीन ! शासनाने घेतली ताब्यात ….

355

त्या जमिनी भोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू!

वेंगुर्ला: दाजी नाईकपाकिस्तानचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामधील मालमत्ता ताब्यात घेऊन विक्रीची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना ‘शत्रू मालमत्ता’ (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. पाकिस्तानी नागरिकाच्या नावावर असलेली अशी मलमत्ता सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात आढळली आहे. ८५ गुंठे जागा असलेल्या या मालमत्तेची मोजणी करून शासनाने ती आपल्या ताब्यात घेतली आहे. तेथे आता तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याला वेंगुर्ले चे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दुजोरा दिला आहे.मूळ भारतीय रहिवासी असलेल्या भारतातील काही नागरिकांनी पाकिस्तान मध्ये गेल्यावर तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. अशांच्या भारतात मालमत्ता आहेत. या मालमत्तांमधून त्यांना बेदखल करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. शत्रू देशांचे नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करतानाच त्यांची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे.

महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता असून, यात सिंधुदुर्गाचाही समावेश आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या एका व्यक्तीची वेंगुर्ले तालुक्यात मालमत्ता आहे. ही अंदाजे ८५ गुंठे जागा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील या शत्रू मालमत्तेची शासनाला माहिती मिळताच त्यांनी त्या जमिनीबाबत कागदोपत्री तपासणी केल्या नंतर ती जमीन मयेकर नामक एका व्यक्तीच्या नावे असल्याचे दिसून आले. त्या जमिनीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. महसूल विभागाकडून त्या जमिनीची पाहाणी व मोजणी केल्यावर शासनाने ती आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच त्या जमिनीवरील झाडांचा लिलाव ही करण्यात आला आहे. आता मालमत्ते च्या भोवती स्थानिक विकास निधीतून तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शासनाने ही जमीन ताब्यात घेतल्या नंतर त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भारत सरकारचे नाव आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जमीन नावावर असलेल्या मयेकर कुटुंबीयांनी आपला यात दोष नसल्याचे सांगत न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठेठावले आहेत.