वेंगुर्ला: वेंगुर्ला भाजप युवा मोर्चा सरचिटणीस नारायण कुंभार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नारायण कुंभार २०२० पासून वेंगुर्ला भाजप युवा मोर्चा सरचिटणीस आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात वेंगुर्ला तालुक्यात आणि विशेषतः तुळस गावात भाजप पक्षाच्या माध्यमातून विविध समजउपयोगी उपक्रम राबवले आहेत. नारायण कुंभार यांनी अनेक गरजू व्यक्तींना वेळोवेळी योग्य ती मदत केलेली आहे. आणि यामुळेच २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुळस ग्रामपंचायत येथून नारायण कुंभार ४०० हुन अधिक मतांनी निवडून आले आहेत. असं असतांना आज अचानक त्यांनी वेंगुर्ला भाजप युवा मोर्चा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नारायण कुंभार यांनी वेंगुर्ला भाजप तालुका अध्यक्ष प्रसाद पाटकर यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा हा राजीनामा अजून तरी मंजूर करण्यात आलेला नाही. भाजपा पक्षासाठी एकनिष्ठ पणे काम करणाऱ्या नारायण कुंभार या तरुण नेतृत्वाने असा निर्णय का घेतला? अशी चर्चा वेंगुर्ला येथील राजीकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच वरिष्ठ हा राजीनामा स्विकारतील का? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच वेंगुर्ला भाजप युवा मोर्चा सरचिटणीस नारायण कुंभार भाजप पक्षाला राम राम ठोकून इतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार काय? अशी चर्चा वेंगुर्ला तालुक्यात होत आहे.