Home स्टोरी वेंगुर्ला न.प.ने आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना दिले ‘विमा सुरक्षा कवच’ 

वेंगुर्ला न.प.ने आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना दिले ‘विमा सुरक्षा कवच’ 

95

समूह आरोग्य विमा काढणारी वेंगुर्ला ही राज्‍यातील पहिली आणि एकमेव नगपरिषद….

 

वेंगुर्ले प्रतिनिधी: 

वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या कायम सफाई कर्मचा-यांकरीता समूह स्‍टार हेल्‍थ इन्‍शुरन्स काढण्‍यात आणि त्यांना विमा सुरक्षा कवच दिले. विषेश म्हणजे सफाई कर्मचा-यांचा स्वनिधीतून समूह आरोग्य विमा काढणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही राज्‍यातील पहिली आणि एकमेव नगपरिषद आहे. या विमा पॉलिसी चे आज मुख्याधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले. तसेच सफाई वेळी लागणारे बूट, हातमोजे, मास, गणवेश, ओळखपत्र आदींचे वितरणही करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी यांनी ही न.प मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांप्रती ॠण व्यक्त केले.

स्वच्‍छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण त‍था शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वच्‍छता पंधरवडा आयोजित करणेबाबत सुचित केलेले होते. त्यास अनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सफाई मित्र यांच्‍याकरीता आज न. प. च्या सभागृहात “सेवा व सुरक्षा शिबीर” आयोजित करण्‍यात आले होते.

वेंगुर्ला नगरपरिषदेकरीता स्वच्छता विषयक सर्व प्रकारची कामे करणाऱ्या तसेच नगरपरिषदेस प्राप्‍त होणाऱ्या विविध पुरस्‍कारांमध्‍ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्‍याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्‍छता विषयक विविध कामे करताना सफाई कर्मचाऱ्यांना रोगराईची लागण होवू शकते यामुळे त्‍यांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होण्‍याची शक्‍यता असते. याची दखल घेऊन मुख्याधिकारी यांनी मंत्रालय स्तरावर या बाबत पाठपुरावा करून विमा पॉलिसी ही खास योजना तयार करून आणली.

दरम्यान त्‍याचबरोबर कंत्राटी सफाई कर्मचा-यांकरीता प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) व आयुष्मान भारत कार्ड काढण्‍यात आली. तदनंतर सफाई कर्मचाऱ्यांना स्‍टार हेल्थ आरोग्य विम्याची पॉलिसी प्रमाणपत्रे तसेच वैयक्तिक सुरक्षा साधने (PPE कीट), कार्यालयीन ओळखपत्रे व गणवेश मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्‍ते वितरीत करण्‍यात आली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, विमा प्रतिनिधी अतुल ओटवणेकर, योगेश गोवेकर, पत्रकार के.जी. गावडे व दाजी नाईक आदी उपस्थित होते.